अमरावती : छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (सारथी) द्वारे सामाजिक जाणीव-जागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता ‘तारादूत’ म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘महिला सक्षमीकरण’, ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयांच्या शहर, गाव-खेड्यांत जाणीव-जागृतीवर भर असणार आहे.
‘सारथी’ने आठ विभागांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तारादूत’ म्हणून नियुक्त होणारे स्वंयसेवक हे पदवीधर असणे अनिवार्य आहे. सामाजिक जाणीव, थोर-महापुरूषांच्या विचारांची माहिती, ज्ञान असलेल्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषत: स्त्री-पुरुष समानतेची जाणीव समाजात रुजावी, यासाठी पथदर्शी प्रकल्पांची दोन वर्षांसाठी पायाभरणी केली जाते आहे. ‘तारादूत’साठी सारथीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना १९ आॅगस्टपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवाराचे वय ३१ आॅगस्ट रोजी ४६ वर्षांपेक्षा जास्त असू नये, अशी नियमावली आहे.
दोन वर्षांकरिता ११ महिन्यांच्या करारावर ही नियुक्ती केली जाणार असून, दरमहा १८ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. विभागानिहाय उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्यानंतर ‘तारादूत’ म्हणून नियुक्ती दिली जाईल. त्यानंतर उमेदवारांचे महिनाभराचे निवासी प्रशिक्षण आणि थेट प्रकल्पाच्या कर्तव्यावर नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात १४४० ‘तारादूत’ निवडले जाणार आहेत.
अशी भरली जातील आरक्षणानुसार पदे अनुसूचित जाती - १८८, अनुसूचित जमाती - १०१, वि.जा. अ - ४३, भ.ज. ब -३६, भ.ज. क - ५२, भ.ज. ड - २८, वि.मा.प्र. - २८, ओबीसी - २७४, ईसीबीसी - १८८, आर्थिक दुर्बल घटक - १४२, खुला- ३६०———-विभागनिहाय भरतीची आकडेवारीपुणे - १६०कोल्हापूर - २००लातूर - १५६औरंगाबाद - १५२नाशिक - १६०मुंबई - १३६अमरावती - २२४नागपूर - २५२
‘तारादूत’हा सामाजिक जाणीव-जागृतीसाठी शासनाचा अंग असणार आहे. ‘सारथी’कडे विशेषत्वाने जबाबदारी दिली आहे. दोन वर्षांत हा पथदर्शी प्रकल्प समाजापर्यंत पोहोचून काम करेल. - डी.आर. परिहार, प्रबंध संचालक, सारथी.