अमरावती : भीक मागणे.. उष्टे खाणे.. उघड्यावर उदरनिर्वाह.. प्लास्टिक वेचणे... भंगार विकणे.. कसेबसे राहणे.. हे चित्र आहे शहरातील निराश्रित पारधी बांधवांचे. मात्र, पोलीस प्रशासनाने या निराश्रित पारधी बांधवांसमवेत शुक्रवारी भाऊबीज साजरी करून सामाजिक कर्तव्याचा परिचय करून दिला. नवीन कपडे, मिठाई व मिष्ठान्नाचे वाटप करून तुम्हीसुद्धा माणूस आहात, ही जाणीव निराश्रित पारधी बांधवांना पोलिसांनी करून दिली. एरव्ही शहरातील निराश्रित पारधी बांधव म्हटले की, किळसवाणे चित्र नजरेसमारे उभे राहते. दुसरीकडे शहरात दिवाळीत सर्वत्र झगमगाट, लखलखणारे प्रकाश दिवे, फटक्यांची आतषबाजी, नवीन कपडे परिधान करून ऐकमेकांना शुभेच्छा देतानाचे चित्र होते. पारधीबांधवांना भाऊबीज भेटअमरावती : मात्र शहरात उड्डाणपूल, रस्त्याच्या कडेला, उघड्यावरील निराश्रीत पारधी बांधव हे सगळे मूकपणे बघत होते. स्वातंत्र्यांच्या अनेक वर्षांनंतरही पारधी बांधवांना सामाजिक न्याय मिळू नये, ही बाब कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या मनाला स्पर्श करुन गेली. परिणामी ठाणेदार पाटील यांनी निराश्रीत पारधी बांधवासमेवत भाऊबीज साजरी करण्याचे नियोजन केले. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना हा उपक्रम साजरा करण्याबाबतची माहिती ठाणेदार दिलीप पाटीेल यांनी दिली. त्यानुसार सिटी कोतवालीत शुक्रवारी भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी निराश्रीत १३५ पारधी बांधवांना नवीन कापड, मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, गुन्हे शाखेचे निरिक्षक प्रमेश आत्राम, शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील, पप्पू गगलानी, सुरेश रतावा, बिलाल भाई, रश्मी नावंदर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी निराश्रीत पारधी बांधवांना त्यांचे हक्क, अधिकाराची जाणीव करुन देताना भीक मागून येणारी पिढी बर्बाद करु नका, असे कळकळीचे आवाहन केले. पारधी समाज हा सुद्धा या देशातील प्रमुख घटक आहे. भारतीय राज्य घटनेने अधिकार प्रदान केले असून शिकून हे अधिकार काबीज करण्याचा सल्ला त्यांनी दिला. सन्मानाने रोजगार मिळवा, परंतु भीक मागू नका, व्यसनापासून दूर रहा, भंगार वेचणे बंद करा असे आवाहन घार्गे यांनी पारधी बांधवांना केले. पोलीस प्रशासनाने निराश्रीत पारधी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी करण्याचा उद्देश म्हणजे या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे होय, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलिसांनी जोपासले सामाजिक कर्तव्य
By admin | Published: November 14, 2015 12:14 AM