विद्यापीठस्तरीय कार्यशाळा : हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयोजनअमरावती : अनाथ मुुलांकरिता शासनान बालगृह, बालसुधारगृह अशी यंत्रणा उभारली आहे. मात्र वयाच्या १८ वर्षांनंतर या मुुलांना बालगृह सोडावे लागते, असा कायदा आहे. त्यानंतर ही मुले - मुुली कशी जगतात? काय करतात? त्यांचे रोजगार व भवितव्याबाबत सर्वच काही अनिश्चित असते. बरेचदा अशा मुलांचे शोषण व गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांचा वापर केला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या अनाथ मुला-मुलींच्या सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम कायद्यात सुधारणा करून अशा विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आरक्षणाबरोबरच समाजाचा पुढाकार आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग व हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हव्याप्र मंडळाच्या आॅडोटोरीयम हॉल येथे शनिवारी एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित तीन स्तरीय चर्चासत्रात विविध तज्ज्ञांनी विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, मानसचे संचालक राजेश मिरगे, वझ्झर आश्रमशाळेचे संचालक शंकरबाबा पापळकर, प्रयास संस्थेचे संचालक अविनाश सावजी, अमरावती बालकल्याण समितीचे दिलीप काळे, जिल्हा महिला बालकल्याण अधीक्षिका राजश्री कोलखेडे, कायदेतज्ज्ञ विलास काळे, गृहअधीक्षिका महात्मे, प्रचार्य ए.बी. मराठे, रजिस्ट्रार एस.व्ही. ढोले, चर्चा प्रतिनिधी जॉन इंगोले, अ.भा. विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांतपाल स्वप्निल पोतदार, चाईल्ड लाईनचे सचिन दिवे, बालगृहातील माजी विद्यार्थी अमित वासनिक, संदीप यावले आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे पहिले सत्र व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. एका सर्वेक्षणानुसार देशात ३ कोटी अनाथ मुले आढळली आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यात ८०० अनाथ मुला, मुलींची नोंद झाली आहे. या अनाथ मुलांना बालगृहामध्ये राहता येते. मात्र, वयाच्या अठरा वर्षांनंतर त्यांना बालगृह कायद्याने सोडावे लागते. त्यानंतर या मुलांना भवितव्याचा कोणीच वाली नसतो. अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा व योग्य मार्ग कसा मिळेल, यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत चेंडके म्हणाले, अनाथांच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थी वर्गाचा पुढाकार आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी बालगृह, बालसुधारगृह व आश्रम शाळांतील मुला-मुलींना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांना प्राधान्य देत त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सकारात्मक कार्य करावे. वझ्झर आश्रमाचे शंकरबाबा पापळकर म्हणाले, दरवर्षी लाखो मुले-मुली वसतिगृहाबाहेर पडत आहेत. वर्तमान सामाजिक परिस्थिती पाहता १८ वर्षांवरील मुला-मुलींना पोरकं करणे हे सर्वाधिक धोक्यात आहे. त्यामुळे या मुला-मुलींचे सक्षमीकरण होईस्तोवर त्यांना बालगृह, आश्रम शाळेतच ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजाने आंदोलनात्मक पुढाकार घेत कायद्यामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. प्रयास संस्थेचे संचालक अविनाश सावजी म्हणाले, अनाथांच्या वेदना या कल्पनेपेक्षाही भयावह असतात. व्यक्तिगत आयुष्य जगताना अनेकांना प्रामुख्याने तरुणांना आपल्या आयुष्यातील समस्या मोठ्या वाटतात. अशावेळी या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी एकदा तरी बालगृह, वसतिगृहामध्ये जाऊन अनाथांची भेट घ्यावी, मायेसाठी, पे्रमासाठी आतुरलेली अनाथ मुलांच्या आयुष्यातील वेदना व समस्यांची जाणीव होताना प्रत्येकला स्वत:साठी तसेच या अनाथ मुलांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा मिळते. उपस्थित श्रोतावर्गाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे व माहिती व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार अनुप मडघे, श्वेता भटकर यांनी केले. या कार्यशाळेला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनाथांच्या सक्षमीकरणासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा !
By admin | Published: February 21, 2017 12:15 AM