यशोमती ठाकूर, जागतिक मृदा दिन कार्यक्रमअमरावती, दि. ५ : मृदेचे कृषिक्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृद्संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त धानोरा गुरव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील तालुका बीज गुणन केंद्रात ना. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे , कीटकशास्त्रज्ञ पी. सिंग, अनिल ठाकूर, अनिल खर्चान, प्रीती रोडगे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते. मृदसंवर्धन दिन हा केवळ उपचार न राहता, लोकचळवळ झाली पाहिजे. रासायनिक खतांचा संतुलित वापर व सेंद्रिय शेतीपद्धतीचे संवर्धन याबाबत कृषी विभागाने गावोगावी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले.
गावातील व परिसरातील प्रगतिशील शेतकरी व महिला गटाच्या शेतकरी सदस्य याप्रसंगी उपस्थित होत्या. मृदा तपासणी व जमीन आरोग्य पत्रिकाबाबत घडीपत्रिका मान्यवरांनी प्रकाशित केली. कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यशाळेत कृषिशास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय चवाळे व संचालन सीमा देशमुख यांनी केले. प्रीती रोडगे यांनी आभार मानले .