प्रत्येक तालुक्यात प्रयोगशाळा : कृषी विभाग घेणार ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्रअमरावती : जिल्हास्तरावर एक वा दोन मृदा तपासणी प्रयोगशाळा असल्याने शेतकऱ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारातच प्रयोगशाळा पोहोचविणार आहे. यासाठी निर्माण ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्राची मदत घेतली जाणार आहे. येत्या वर्षात शेतकऱ्यांना त्यांच्या गावात, तालुक्यात मातीची तपासणी करणे शक्य होणार आहे.मातीमध्ये दिवसेंदिवस कमी होत असलेली पोषक मुल्याची कमतरतेमुळे उत्पादनात कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करतो यामुळे जमिनीचे आरोग्य आणखी बिघडते. पिकांना हवे ते अन्नघटक मातीतून न मिळाल्याने दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे. मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मृदा सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. सद्या राज्यात अशा एकूण २९ प्रयोगशाळा आहेत. जिल्ह्यांचा विस्तार होत असल्याने अनेकदा या ठिकाणी मातीचे नमुने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतामधील मातीत कशाची कमतरता आहे, याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभाग आता पुढे सरसावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही खासगी कंपन्यांद्वारा कोठेही नेता येणाऱ्या (पोर्टेबल) माती परिक्षण मशीन्स बनविल्या आहेत त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या मशीन्स ७५ हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत व आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असल्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर या मशीन्स बसविण्यात येणार आहे. याबाबतची बैठक मागील वर्षी पुणे येथे पार पडली व याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)- म्हणून माती परीक्षण आवश्यकजमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही महत्त्वाच्या बाबी उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहे. रासायनिक खतांची अवाजवी व असंतुलीत वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिंचनासाठी जमीन सतत पाण्याखाली राहणे, यामुळे मातीचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटने, उत्पादनात कमी येणे या बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. म्हणून पेरणीपूर्व जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये जाणून घेणे व त्यानुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे महत्वाचा आहे.माती नमुना घेण्याच्या पद्धतीवर यश अवलंबूनमाती परीक्षणाचे महत्त्व, त्याची सत्यता, त्यापासून मिळणारे फायदे हे शेतातील मातीचा नमुना पद्धतीवर अवलंबून आहे. चुकीच्या पद्धतीने नमुना घेतल्यास माती परीक्षणाच्या इतर पैलुचे महत्त्व कमी होते. त्यापासून अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीनेच होणे हितावह आहे.नियोजन समितीकडे देणार प्रस्तावजिल्हा नियोजन समितीच्या निधींतर्गत या मशीन्स घेण्याविषयी कृषी विभागाचा खल सुरू आहे. सोईचे व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीकडे कृषी विभागाद्वारा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.
माती परीक्षण होणार दारात, शेतकऱ्यांना दिलासा
By admin | Published: February 28, 2017 12:09 AM