- गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुण्याच्या रामा फर्टिकेम या कंपनीने अनेक जिल्ह्यांत विक्री केलेल्या रासायनिक खतांचा नमुने अहवाल अप्रमाणित आला आहे. खताच्या नावावर कंपनीने चक्क माती विकून शेतकऱ्यांना करोडोंचा चुना लावला आहे. २०२२ पासून खत उत्पादनांसाठी कृषी विभागाचा परवाना असलेल्या या कंपनीद्वारे कोणत्या जिल्ह्यांत किती टन खतांची विक्री केली, याची कुठलीच माहिती कृषी विभागाकडेही उपलब्ध नाही.
कंपनीविरोधात गुन्हा दाखल संबंधित कंपनीचे अमरावती जिल्ह्यात डीएपी व एनपीके या खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने कंपनीविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. त्यानंतर यवतमाळमधील अनेक तालुक्यांत खतांची विक्री झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्वी (जि. वर्धा) येथेही याच कंपनीच्या बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातही संबंधित कंपनीच्या बोगस खतांची विक्री झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.कंपनीचा परवाना कृषी संचालकांद्वारे रद्द करण्यात आला. ऑनलाइन प्रणालीमध्ये या कंपनीद्वारे किती टन खत कोणत्या जिल्ह्यात विक्री केले याची नोंद नसल्याने कृषी विभागाकडे कंपनीच्या साठ्याची माहिती नाही.
अनुदान श्रेणीमधील खतेसंबंधित कंपनीद्वारा विक्री करण्यात आलेली रासायनिक खते ही केंद्र सरकारच्या अनुदानाच्या श्रेणीमध्ये येत असल्याने या खतांची ‘आयएफएमएस’ प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीद्वारा तसे करण्यात आले नाही; परंतु, केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाने खतांची विक्री केली. कंपनीकडील आयसी प्रमाणपत्राची सद्य:स्थितीदेखील डिसॲक्टिव्ह आहे.
रामा फर्टिकेम कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. कंपनीने आयएफएमएस प्रणालीद्वारे खतांची विक्री न करता ऑफलाइन केली. त्यामुळे कंपनीद्वारा किती पुरवठा झाला व किती टन खतांची विक्री झाली, त्याची माहिती उपलब्ध नाही. - किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक