लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महावितरणच्यावतीने आलेल्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतात सोलर कृषिपंप देण्याची योजना सांगितली. आदिवासींना दिवास्वप्न दिसले. घरातील भांडीकुंडी मोडून आवश्यक रक्कम भरली. एकदाचे पंप लागले की, दुहेरी पीक घेऊ, हाच त्यांचा उद्देश होता. परंतु, दीड वर्षे झाली तरी अधिकारी फिरकले नाहीत. पूर्वी काही शेतांमध्ये लोखंडी पाईपचे सांगाडे लागले. पुन्हा महिन्यांपूर्वी उर्वरित काही शेतात लोखंडी पाइप उभे केले गेले. सौर कृषिपंप मात्र शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाले नाही.अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरात वीज, पाणी, रस्ता, शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा आजही नाहीत. विकासापासून कोसोदूर असलेल्या या भागात निसर्ग आणि अधिकारी दोन्ही आदिवासींची परीक्षा पाहत असल्याचे सत्य आहे. हतरू परिसराच्या भांडूम, सलिता, सुमिता शिवारातील आदिवासी शेतकर्यांनी महावितरणकडे सौर कृषिपंपासाठी अर्ज केले होते. दीड वर्षांपूर्वी रक्कम भरली. त्यानंतर केवळ शेतात लोखंडी पाईपचे सांगाडे उभे करून विविध कंपन्यांचे अधिकारी निघून गेले. त्यामुळे आदिवासींनी जावे तरी कुणाकडे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.पुन्हा सांगाडे उभे करून गेलेआदिवासींच्या शेतात उभे करण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर संबंधित कंपन्यांचे अधिकारी सामान घेऊन परिसरात फिरकले. आतादेखील कृषिपंप लागण्याच्या आशेवर असलेल्या आदिवासींच्या भांडुम रस्त्यावरील शेतांमध्ये तसेच सांगाडे उभे करून संबंधित कंपन्यांचे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर व स्थानिक आमदारांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मेळघाटात शेतकरी आत्महत्या हव्यात का?आदिवासी पोटासाठी रात्रंदिवस अंगमेहनतीची कामे करतो. मजुरीसाठी हजारो किलोमीटर दूर जाऊन कुटुंबाचे पालनपोषण करतो. त्याच्याकडील शेतजमीन कोरडवाहू आहे. पावसाळ्यात पिकवलेला सोयाबीन पूर्णत: सडल्याने गहू, चणा, मसूर या रबीतील पिकांकडे नजर आहे. मात्र, त्यासाठी ओलिताची सोय नसल्याने आदिवासी हवालदिल झाला आहे. जवळची पुंजी, भांडीकुंडी मोडून शेतात सौर कृषिपंप मिळण्यासाठी रक्कम भरली. परंतु, लोखंडी पाईपशिवाय काहीच मिळाले नाही. शासन आणि अधिकारी आदिवासी शेतकर्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा खडा सवाल करीत पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी आदिवासींची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.सौर कृषिपंपासाठी केवळ लोखंडी आले. सौर प्लेट आणि कृषिपंप मात्र देण्यात आले नाही. कोरडवाहू शेती असलेल्या आदिवासींना गहू, चणा, मसूर आदी पिके घेता येणार नाहीत. संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.नानकराम ठाकरेपंचायत समिती सदस्य, चिखलदरा
मेळघाटातील सौर कृषिपंप राहिले कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:00 AM
अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरात वीज, पाणी, रस्ता, शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा आजही नाहीत. विकासापासून कोसोदूर असलेल्या या भागात निसर्ग आणि अधिकारी दोन्ही आदिवासींची परीक्षा पाहत असल्याचे सत्य आहे. हतरू परिसराच्या भांडूम, सलिता, सुमिता शिवारातील आदिवासी शेतकर्यांनी महावितरणकडे सौर कृषिपंपासाठी अर्ज केले होते. दीड वर्षांपूर्वी रक्कम भरली.
ठळक मुद्देआदिवासींची बोळवण : सांगाडे केलेत उभे, सौर प्लेट लागल्या नाहीत, फसवणुकीचे शल्य