अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तपोवननजीक सौर ऊर्जेवरील वीज प्रकल्प साकारला जाणार आहे. अमृत योजनेतून हा प्रकल्प तयार होणार असून वीज प्रकल्पासंदर्भात ११.३० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडून शहराला नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील अनेक वर्षापासून निधी अभावी मजिप्राने जुन्या पाईपलाईन बदलविल्या नाहीत. त्यामुळे पाणी गळतीसह अनेक समस्या समोर आल्या आहेत. लवकरच समस्यांचा निपटारा न झाल्यास पाणी पुरवठ्यासंबधी मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमृत योजनेतून जीवन प्राधिकरणाची सर्वच कामे होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जीवन प्राधिकरणच्या विविध कामांसाठी १५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये सिंभोरा येथील पंपाचे काम महत्त्वाचे आहे. शहरातील जुन्या पाईपलाईन प्राधान्याने बदलविल्या जाणार आहेत. तपोवननजीक सौर ऊर्जेवरील विद्युत प्रकल्पाचा प्रस्ताव सुध्दा मंजुरीकरीता पाठविला आहे. या प्रकल्पातून २ मेगावॅट विजेची निर्मिती करून ती महावितरणाला विक्री केली जाईल.
तपोवनजवळ सौर ऊर्जा वीज प्रकल्प
By admin | Published: March 26, 2016 12:16 AM