लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : जिथे मुबलक पाणी आहे, तिथे विजेची अडचण पाहता, शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत सौर कृषिपंप बसविलेल्या मेळघाटच्या काटकुंभ येथील शेतकऱ्यांना सीआरआय कंपनीने वेठीस धरले आहे. वॉरंटीमध्ये नादुरुस्त पडलेले कृषिपंप वारंवार तक्रार करूनही संबंधित कंपनी दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन लक्ष देण्याची मागणी केली आहे.
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील गणेश कमलसिंग बडले, अमित रामविलास मालवीय, सुधीर रामकिसान मालवीय या शेतकऱ्यांनी शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत सीआरआय कंपनीचे सोलर पंप दोन वर्षांपूर्वी घेतले. शेतात कृषिपंप लावले, तेव्हापासून व्यवस्थित चालत नाहीत. सतत नादुरुस्त होत आहेत. कंपनीचे कर्मचारी किंवा टोल फ्री क्रमांकाशी वारंवार संपर्क केला असता, एखाद्याच वेळेला दुरुस्ती होते. ते जाताच पुन्हा पंप दोन-चार दिवसांत बंद पडतो. नामांकित कंपनी असल्याचे समजून शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली होती. प्रत्यक्षात मिळालेल्या साहित्याचा दर्जा फारच सुमार आहे.
पंप खराब, गहू करपलासौर कृषिपंप लावल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येईल, ही अपेक्षा असताना गव्हाच्या हंगामातच पंप खराब झाले. त्यामुळे गहू करपून गेला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. आधीच अवकाळी येणारा पाऊस व नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती डबघाईस आली आहे. तक्रारीची दखल घेत पंप दुरुस्त करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.