अमरावती : काही दिवसांपूर्वी ताडोबा अभयारण्यात माया नामक वाघिणीने महिला वनरक्षक स्वाती यांच्यावर अचानक हल्ला चढविला आणि जंगलात फरपटत नेऊन यमसदनी धाडले. आजतागायत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे जंगलात अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. परिणामी वन्यजीव आणि वन विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक वापरण्याचा प्रस्ताव आहे.
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष हा जगातील प्रजातीच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी मुख्य धोक्यांपैकी एक आहे, असे वर्ल्ड फंड फॉर नेचर (डब्ल्यू डब्ल्यृू एफ) आणि युनायटेड एन्व्हायर्नमेंट प्राेग्राम (यूएनईपी) यांनी ८ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालात स्पष्ट केले आहे. राज्यात २०२० मध्ये मानव-वन्यजीव संघर्षात ८८ मानवी मृत्यूंसह अर्थव्यवस्था, मानवी आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण व पर्यावरणावर परिणाम जाणवला. २०१७ ते २०२० या कालावधीत संघर्ष दुप्पट झाला. यात ५४ लोक मारल्या गेले. ४.३२ कोटी नुकसान भरपाई दिली. बिबट्याच्या हल्ल्यात ३२ आणि वाघांच्या हल्ल्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात फिल्डवर काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सौरऊर्जेवरील ही स्मार्ट स्टिक उपयोगी ठरणार आहे.
अशी आहे सोलर स्मार्ट स्टिक
ही एक बहुउद्देशीय सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट स्टिक आहे. जी कठीण प्रदेशात गिर्यारोहण आणीबाणीच्या परिस्थितीत वापरली जाऊ शकते. ती स्टन नगसह सुसज्ज आहे. जी कोणत्याही वन्य प्राण्यांशी धोकादायक चकमक झाल्यास एक शक्तिशाली सर्वात सुरक्षित स्वसंरक्षण प्रदान करू शकते. ती वजनाने खूप हलकी आणि बळकट आहे. जंगल, डोंगराळ, खडकाळ, मैदानी, मार्श, रेंजर्स, वनरक्षक आदींसाठी उपयुक्त आहे.
- वन अधिकाऱ्यांना जंगलात पाहणी, पायवाट, गस्त किंवा वन्यजीवांच्या हल्ल्यापासून संरक्षण करता येईल
- वनरक्षक या स्मार्ट स्टिकमधील पॅनिक बटण वापरून मदतीसाठी सतर्क होऊ शकतात.
- गस्तीच्या वेळी या स्मार्ट स्टिकवरील विविध मोडमधील लाईट्सचा वापर मार्गशोधक म्हणून करू शकतात
मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटना दुर्देवी आहेत. यात वनअधिकारी, कर्मचारी बळी गेले आहेत.
त्यामुळे आता जंगलात संरक्षणाच्या दृष्टिने सौर उर्जेवरील स्मार्ट स्टिक वापरण्याचे प्रस्तावित आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, महाराष्ट्र