लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : स्थानिक तहसील कार्यालयातील कंत्राटी स्वरूपाची ऑनलाइन धान्य वितरण व्यवस्था कोरोनाच्या संकटातही आपली पूर्वापार पद्धती वापरत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे खोडगाव येथील एका कुटुंबाला तीन महिन्यांपासून धान्य मिळालेले नाही. विशेष म्हणजे, गाजावाजा करून सोशल मीडियात प्रचारित होणारी ऑनलाइन तक्रारसुद्धा या कुटुंबास न्याय देऊ शकली नाही.तालुक्यातील खोडगाव येथील सुशीला सदाशिव येऊल यांच्या कुटुंबात एकूण १२ सदस्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी आपले कार्ड वेगळे करण्याची संपूर्ण सदस्यांचे आधार कार्ड धान्य वितरण यंत्रणेच्या ऑनलाइन प्रक्रियेत दिले. या यंत्रणेने फक्त तीन सदस्यांची नावे ऑनलाईन घेऊन वेगळे रेशनकार्ड तयार केले. मात्र, इतर सदस्यांची नावे मूळ कार्डात जशीच्या तशी न ठेवता गायब केली. ही चूक यंत्रणेची आहे; पण त्याचा भुर्दंड मूळ कार्डधारक सदस्य भोगत आहेत. विशेष म्हणजे, मूळ कुटुंबापासून विलग करण्यात आलेल्या रेशन कार्डवरदेखील तीन महिन्यांपासून धान्य मिळालेले नाही. त्यामुळे सदर कुटुंबीयांना धान्य मिळविण्यासाठी इतरत्र मदत घ्यावी लागत आहे.याप्रकरणाची ऑनलाईन तक्रार झाली; पण कार्यवाही करा, संबंधितांना परस्पर कळवा, हे इतपत कार्यवाही झाली आणि त्यानंतर यंत्रणा अजूनही ढिम्म बसली आहे.
कंट्रोल डीलरशी बोलणे करून द्यायाप्रकरणी तहसीलदारांशी संपर्क साधला असता, कंट्रोल डिलरशी आपले बोलणे करून द्या, अशी मागणी त्यांनी केली. वास्तविक, सर्व पुरवठा निरीक्षक आणि कंट्रोल डीलर यांचे मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात कायम ठेवलेले असतात.याप्रकरणी लकरात लवकर निर्णय द्यावा, अशी येऊन कुटुंबीयांची मागणी आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर 'लॉकडाऊन' व राज्यात संचारबंदी लागू आहे. त्या अनुषंगाने हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या उदात्त हेतूने समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना रेशन धान्य दिले जात आहे. मात्र, तालुक्यातील या तांत्रिक घोळामुळे रेशन व्यवस्थेतील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.आपण या प्रकरणाचे अध्ययन करीत आहोत. रेशन कार्डचे वाचन करून झालेला घोळ त्वरित निवारण करण्यात येईल.- नारायण काकडे,धान्य वितरण अधिकारी