अन्याय : निम्नपेढी प्रकल्पबाधित गणोरीच्या शेतकऱ्यांची थट्टा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहणाचा एकरी ११ लाख ८० हजार रूपये मोबदला मिळाला, त्याच प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या शेतजमिनींसाठी काही शेतकऱ्यांना एकरी १ लाख १० हजार रूपये मोबदला देण्यात आला. मोबदल्यातील तफावतीमुळे अन्याय झालेल्या गणोरीच्या प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांनी गुरूवारी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांना निवेदन देऊन एकरी ११ लक्ष ८० हजार रूपये दराने मोबदला मिळावा, अशा मागणीचे निवेदन सादर केले. मागणी पूर्ण होईपर्यंत हा संघर्ष कायम राहणार असून टप्पयाटप्याने तो तीव्र केला जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. निम्नपेढी प्रकल्पाच्या निंभा कालव्यासाठी सन २०११ साली शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात. यासाठी गणोरी येथील शेतकऱ्यांना १ लाख १० हजार रूपये इतका अल्प म्हणजे अगदी कवडीमोल मोबदला देण्यात आला आहे. वास्तविक जेव्हा या जमिनींचे अधिग्रहण झाले तेव्हा जमिनींच्या भावात तेजी होती. त्यावेळी १५ लक्ष रूपये प्रती एकरानुसार गणोरीतील शेतकऱ्यांनी जमिनीची विक्री झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर याच प्रकल्पासाठी सन २०१६-१७ मध्ये जमीन अधिग्रहण करण्यात आले. या अधिग्रहणापोटी ११.८० लक्ष रूपये प्रतीएकरानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. त्यातुलनेत गणोरी येथील शेतकऱ्यांना सन २०११ मध्ये देण्यात आलेला मोबदला अत्यंत अल्प आहे. शेतकऱ्यांवर हा अन्याय असून सर्वच बाधित शेतकऱ्यांना ११.८० लक्ष प्रतीएकर दराने मोेबदला देण्यात यावा व सन २०११ पासून ते वाढीव मोबदला मिळेपर्यंत तफावतीच्या रकमेवर १८ टक्के दराने व्याजही देण्यात यावे, अशी मागणी गणोेरीतील प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागण्यांचे निवेदन देताना सोपान टेकाडे, संदीप देशमुख, नामदेव टेकाडे, विनायक ठोंबरे, विनायक जंगले, अनिल देशमुख, रेहानाबी मस्तान खाँ, अरूण देशमुख, मनोज जंगले, दिनकर जौंजाळे यांच्यासह आदी प्रकल्पबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणाला १२ लाख, कुणाला १ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:24 AM