नांदगाव पेठ (अमरावती) : उभ्या ट्रॅक्टरला कार धडकल्याने आई-वडिलांसह मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास माहुली जहागीर येथे घडली. या घटनेत दहा वर्षीय नातू गंभीर जखमी झाला. मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. वडिलांच्या उपचारासाठी सदर कुटुंब हे कारने अमरावतीला जात असताना माहुली जहागीर गावासमोर एका पुलानजीक ट्रॅक्टरला कार धडकल्याने हा भीषण अपघात झाला.सोमेश प्रभाकर काळबेंडे (२६), प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (६५), राजमती प्रभाकर काळबेंडे (६२, सर्व रा. गजानन महाराज मंदिरालगत, वरूड), अशी मृतांची नावे आहेत. प्रभाकर काळबेंडे यांचा नातू वरद सुरेंद्र दोंदलकर (१०) हा गंभीर जखमी झाला. त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वडील प्रभाकर काळबेंडे यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायचे असल्याने सोमेश काळबेंडे हे शनिवारी सकाळी ११ वाजता वरूड येथून एमएच २७ बीझेड ०७०६ या कारने अमरावतीसाठी निघाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास माहुली जहागीरपुढे एका पुलाजवळ ही भरधाव कार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. यात कार चालवित असलेला सोमेश व त्यांचे आई-वडील घटनास्थळीच ठार झाले. या भीषण धडकेत कारचा पुढील भाग चकनाचूर झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ते मदतकार्य सुरू केले. माहुली जहागीरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथून त्याला त्वरित खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.---------------काळबेंडे दाम्पत्य निवृत्त शिक्षकप्रभाकर काळबेंडे व राजमती काळबेंडे हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी अनेक वर्षे वरूड येथील न्यू हायस्कूलमध्ये सेवा दिली. अविवाहित असलेला मृत सोमेश हे कृषी संबंधित व्यवसायाशी जुळलेला होता. जखमी वरद हा आजोबा प्रभाकर काळबेंडे यांच्याकडे वरूड येथे शिकायला आहे. घटनेची माहिती मिळताच वरूडमध्ये एकच शोककळा पसरली. नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करीत आक्रोश केला.
कारच्या भीषण अपघातात आई-वडिलांसह मुलगा ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 8:25 PM