अमरावती : आयटी कंपनी उभारण्याच्या नावावर पुणेस्थित जावयाने अमरावतीकर सासऱ्याला तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांनी चुना लावला. तो जावई एवढ्यावरच थांबला नाही, तर ती रक्कम परत करण्यास नकार देऊन त्याने पत्नीपासून घटस्फोट घेतला. मे २०१५ पासून ती फसवणुकीची मालिका अगदी आतापर्यंत सुरू होती. याप्रकरणी सासऱ्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावई विक्रम अनिल दुबे (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे) याच्याविरूध्द १४ मार्च रोजी पहाटे २.३४ च्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सासऱ्याला लुबाडून कंपनी सुरू न करता तो पळून गेला.
येथील कठोरा रोडवरील हॉलिवुड कॉलनी येथील ६५ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला दोन मुली असून, त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न विक्रम दुबे याच्याशी झाले होते. दरम्यान, आपणास आयटी कंपनी स्थापन करायचा मानस त्याने अमरावतीकर सासऱ्यांकडे बोलून दाखविला. आपणही त्या कंपनीच्या संचालक मंडळात असाल, असा शब्द त्याने सासऱ्यांना दिला. त्यासाठी जावई विक्रमने सासऱ्यांकडे मोठ्या भांडवलाची मागणी केली. गुंतवणुकीचा परतावा आपण वाटून घेऊ, अशी बतावणी त्याने केली.
दरम्यान विक्रम दुबे याने १ जुलै २०१५ रोजी कंपनीची नोंदणी केली. मात्र नोंदणी दस्तावेजात सासऱ्यांचे नाव कुठेही समाविष्ट केले नाही. दरम्यान ती आयटी कंपनी अमरावतीत उभारू, त्यासाठी १३० एकर जमीन अमरावती एमआयडीसीमध्ये बघा, अशी विनंती केली. सासऱ्यांना त्याने विश्वासात घेतले. मे २०१५ मध्ये तक्रारकत्या सासऱ्यांनी एफडी तोडून जावयाला १ लाख रुपये दिले. तर पगारातून देखील १४ हजार ५०० रुपये दिले. ते निवृत्त झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या भविष्य निधीमधून ११ लाख ८५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळती केले. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने सासऱ्याच्या खात्यातून ५ लाख, २.२२ लाख, २८.३५ लाख, ६८.२८ लाख व १६ लाख ६० हजार असे एकूण १ कोटी ४८ लाख ५३ हजार ६९६ रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करवून घेतले.
जावई निघाला भामटा
आरोपी जावयाने सासऱ्याच्या पुणे व अमरावती येथील एकुण तीन बॅंक खात्यातून ती रक्कम ट्रान्सफर केली. मात्र कंपनी उभारण्यासाठी टाळाटाळ चालविली. त्यामुळे फिर्यादी वृध्दाने आपल्या मुलीकडे त्याबाबत विचारणा केली. मुलीने देखील पतीला बाबा कंपनीबाबत विचारत आहेत, कंपनी होत नसेल तर बाबांची रक्कम परत करा, असे आरोपी विक्रमला बजावले. त्यामुळे त्या दाम्पत्यांमध्ये टोकाचा वाद झाला. परिणामी दोघांमध्ये घटस्फोट देखील झाला.