जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : बेलावासीयांची जीवघेणी कसरत, दुचाकीसह दोघे बचावले
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
चिखलदरा : परिसरात काळेकुट्ट ढग दिसले की, बेला गावातील आदिवासींच्या जिवाचा थरकाप उडतो. घराच्या दिशेने लहान-मोठे सर्वच सैरावैरा पळत सुटतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा जीवघेणा खेळ एका पुलाचे बांधकाम न झाल्याने होत आहे. गत आठवड्यात दुचाकीसह दोघे वाहून जाताना शिक्षकांच्या समयसूचकतेने बचावले. तरीही प्रशासन निद्रिस्त असल्याचे संतापजनक चित्र आहे
चिखलदरा ते घटांग मार्गावर सलोना ते बेला या तीन किमी मार्गात दीड किलोमीटरवर रामजी कासदेकर यांच्या शेतानजीक जोगीमाडी नाला आहे. या नाल्यावरील जुना पूल जमीनदोस्त झाला आहे. उंचावर असलेल्या लोनाझरी गावात परिसरात पाऊस कोसळला की, हा मार्ग जलमय होतो पुलावरून दहा फुटांपेक्षा अधिक पाणी वाहून जाते. गावांचा मुख्य मार्गाची संपर्क तुटतो. या पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला परिसरातील आदिवासींनी अनेकदा निवेदन दिले, असा आक्षेप भाजपचे पदाधिकारी दिनेश बछले यांनी ‘लोकमत’शी बोलताना घेतला. यासंदर्भात गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
बॉक्स
दुचाकीसह दोघे बचावले
आठ दिवसांपूर्वी जोगीमाडी नाल्यावरील पुलावर पाणी असताना बेला येथील दोन युवकांनी दुचाकी ढकलत पायी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यभागी त्यांचा तोल गेला. पुलाच्या काठावर असलेले शिक्षक प्रतीक खांडेकर व रूपेश माथने यांनी दोघांना वाचविले. गतवर्षी रुग्णवाहिकासुद्धा याच जोगीमाडी नाल्यावर अडकली होती. मात्र, चालकाच्या समयसूचकतेने प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेसह बाळाचे प्राण वाचले होते.
कोट
येत्या आर्थिक वर्षात या पुलाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. मान्यता व आर्थिक मंजुरातिची तरतूद होताच तात्काळ काम सुरू करण्यात येईल.
- राहुल शेंडे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चिखलदरा
210821\img-20210820-wa0030.jpg
त्यांचा जीवघेणा खेळ