अमरावती : सहकारातून समृद्धीकडे ही म्हण यथार्थ करत मोडकळीस आलेली बँक आज सुस्थितीत आहे. ५५० कोटी रुपयांचे भागभांडवल आजमितीस तब्बल २,४०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील १५ वर्षांतील बँकेच्या प्रगतीचा आलेख सतत चढताच आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकमत कार्यालयाला देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बँकेची झालेली प्रगती मतदार, खातेदार आणि शेतकऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच की काय विदर्भातील अन्य जिल्हा बँका डबघाईस आल्या असताना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २० वर्षांपासून अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. बँकेची सूत्रे सांभाळल्यानंतर सर्वप्रथम बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान होते. ते संचालक मंडळाने स्वीकारत बँकेला बिकट परिस्थितीतून बाहेर करण्यासाठी प्रयत्न केले.