अमरावती/ संदीप मानकर
पोलिसांकडून शहरवासीयांना कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत हवी असल्यास आता ११२ नंबर डायल करावा लागणार आहे. नंबर डायल करताच दहाव्या मिनिटाला पोलीसदादा घटनास्थळावर मदतीला धावून येणार आहे. याकरिता त्यांना चारचाकी व दुचाकी वाहनांनी रसद मिळाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले. मात्र, ११२ नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सध्या प्रशासन पातळीवर सुरू आहे. तूर्तास मदतीकरिता १०० हा क्रमांक अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील पोलीस ठाणे - १०
पोलीस अधिकारी - ७८
पोलीस कर्मचारी - १८००
बॉक्स:
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तात्काळ मदत हवी असल्यास काही दिवसांतच नागरिकांना ११२ हा क्रमांक डायल करावा लागणार आहे. हा टोल फ्री क्रमांक डायल केल्यानंतर जास्तात जास्त दहा मिनिटात पोलीस नागिरकांच्या मदतीला घटनास्थळावर दाखल होणार आहेत.
बॉक्स:
३०० पोलिसांना दिले प्रशिक्षण
११२ क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीला पोलीस धावून जातील. त्यांची एक टीमच कार्यरत राहणार आहे. त्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील ३०० पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी ‘लोकमत’ला दिली.
बॉक्स:
जीपीएसद्वारे नियंत्रण
सदर ११२ क्रमांक डायल करणाऱ्याचे ठिकाण जीपीएस सिस्टीमद्वारे मुंबईचे मुख्य केंद्र व नागपूरच्या उपकेंद्रावर शोधले जाईल. तेथून संबंधित पोलीस आयुक्त किंवा ग्रामीण हद्दीत त्याचे मॉनिटरिंग करण्यात येईल. ११२ क्रमांकाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या टीमला तात्काळ ही माहिती मिळवून दहा मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचेल.
बॉक्स:
वाहन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
११२ क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर चार चारचाकी व १२ दुचाकी वाहने शहर पोलीस दलात दाखल होतील. पोलीस आयुक्तांनी वाहन खरेदीकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याकरिता निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. किती निधी मंजूर झाला, हे कळू शकले नाही. तथापि, लवकरच पोलीस दलात १६ नवीन वाहने दाखल हण्याची शक्यता आहे.
कोट
११२ क्रमांकाची सेवा लवकरच लागू होणार आहे. त्याकरीता ३०० पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले. याकरिता वाहने लागणार आहेत. वाहनांकरिता निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती