लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव श्रीकांत आकोडे (१५, रा. जुना कोंडवाडा, राजापेठ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ कोंडवाड्यापासून सुमारे १ किमी अंतरावरील जयरामनगर येथील एका विहिरीत ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास सायकल घेऊन घरबाहेर पडलेला वैभव परत न आल्याने त्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. रात्री ११.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करीत राजापेठ पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली. त्या भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव हा सायकलने जयरामनगर भागाकडे जाताना दिसतो. तो धागा पकडून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी वैभवच्या कुटुंबीयांसह त्या भागाचा कानाकोपरा शोधून काढला. तेथे दुपारी काही मुले पतंग उडवत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, पतंग मिळवण्याच्या नादात धावताना वैभवने त्याची सायकल एका भिंतीलगत उभी करून ठेवली होती. सायंकाळपर्यंत ती तशीच राहिल्याने तेथील एका स्थानिकाने ती आपल्या घरात सुरक्षित ठेवली. ८ डिसेंबर रोजी त्यांनी ती सायकल ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी आणून ठेवली. बुधवारी सायंकाळी ती सायकल वैभवची असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले. त्यामुळे त्याच भागात शोधकार्य करण्यात आले. वैभवच्या वडिलांचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्याची आई घरकाम करते. मोठी बहीण आयटीआय शिक्षणासाठी औरंगाबादला आहे. मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर वैभव हा सायकल घेऊन बाहेर गेल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली होती.
अग्निशमनची मदतठाणेदार मनीष ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत त्या भागातील नाले, विहिरी पिंजून काढल्या. जयरामनगरात ज्या ठिकाणी सायकल आढळली, तेथे शोध घेत असताना त्या भागात खचलेली विहीर झाडाझुडुपांनी वेढल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. मोठ्या टॉर्च घेऊन त्या विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात केवळ मानवी केस आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ती विहीर लक्ष्य करीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घेतली. अखेर बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास त्यातून मृतदेह हाती लागला. त्या मृतदेहाची ओळख वैभव आकोडे म्हणून पटविण्यात आली. तो गाळात फसला होता.
कुटूंब हतबलवाकोडे कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. वैभवची आई धुणीभांडी करीत वैभव व मुलीचा सांभाळ करीत होती. वैभवच्या अकाली जाण्याने ती ‘माय’ हतबल झाली आहे.