बियाणे झाले मातीमोल : ५० टक्के पेरण्या पूर्ण; शेतकरी आर्थिक विवंचनेत लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : रोहिणीच्या अल्प सऱ्या आणि मृगाच्या आंखमिचौलीच्या दरम्यान तालुक्यात खरीप पिकाची पेरणी अनेकांनी आटोपती घेतली. मात्र पावसाचा लहरीपणा कायम असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ओलितांची सोय असणाऱ्यांनी तुषार संचाच्या सहाय्याने पेरलेले धान्य उगवण्याची कसरत सुरू ठेवली आहे.ज्यांची बियाणे ओलसर भागात पडल्या आहेत ते काही प्रमाणात उगवताना दिसत आहे, तर काही बियाणे मातीतच असल्याने दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे मेळघाटात पाऊस समाधानकारक असतो. मात्र यावर्षी पावसाने टप्प्याटप्प्याने विविध भागांत हजेरी लावत आहे. मात्र हा पाऊस शेतीला पोषक असे दिसून येत नसल्याने यंदा मेळघाटातही पाण्याचे संकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत १०० टक्के पेरणी पूर्ण करणाऱ्या धारणी तालुक्यात सध्या केवळ ४० ते ५० टक्के पेरणी झाल्या आहेत. तर अनेकांना आजही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्राच्या म्हशीवर भिस्तरोहिणी व मृग हे दोन पावसाचे नक्षत्र दगाबाज ठरल्यावर आता आर्द्राच्या म्हशी वाहनापासून मोठी अपेक्षा आहे. म्हशीला पाणी आवडते. त्यामुळे आर्द्रात समाधानकारक पाऊस पडण्याची आशा आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे आर्द्राकडे लागले आहे.‘धोंडी धोंडी पाणी दे’दर्यापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पाऊस कोसळला, मात्र धो-धो पडलेला हा पाऊस शेती, नाले खरडून वाहून गेला. या पावसाने जमिनीची तहान मात्र भागलेली नाही. आजही जमिनीत पूर्ण कोरडा ठणठणाट आहे. रोजच आकाशात काळे कुट्ट ढग असल्याने आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पेरणी होऊन तब्बल १५ दिवस उलटल्यानंतरही पाऊस येत नसल्याने सर्वत्र दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. निसर्गाने शेतकऱ्यांवर दया करून दमदार पाऊस कोसळावा, यासाठी गावागावांत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी विनवणी होत आहेत.भातकुलीत पाच टक्के पेरणीटाकरखेडा संभू : समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत पेरणीचे दिवस जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ५ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यात काही ठिकाणी पेरणी झाली. पण पाऊस नसल्याने उगवलेले रोप कोमेजण्याची शक्यता आहे.
मेळघाटातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: June 27, 2017 12:12 AM