अमरावती : मृगात खरिपाची पेरणी आटोपून बळीराजा पंढरीला पांडुरंगाच्या वारीला जात असतात. अलीकडे मात्र, वरुणराजाची कृपादृष्टी जरा उशिरा होत आहे. यंदाही गुरुवारी आषाढी एकादशी असताना शिवार कोरडेच असल्याने शेतकऱ्यांचे पांडुरंगाच्या चरणी आर्जव आहे.
नको पांडुरंगा मला सोन्याचांदीचे दान रेफक्त भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मान्सून सक्रिय झाल्याची वार्ता दिली. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व एखादी हलकी सर येत आहे. त्यात ऑरेंज अलर्टही दिल्याने जिल्ह्यात किमान २५ हजार हेक्टरमधील पेरण्या कोरड्यातच आटोपल्या. मात्र, पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच कृषी विभागाने आठ दिवस कमी पाऊस किंवा पावसात खंड राहण्याचा अलर्ट बुधवारी दिल्याने ६.५० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.