लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नांदगाव खंडेश्वर येथे सततच्या पावसात शेतातील कापून ठेवलेल्या गंज्या भिजल्याने सोयाबीन कुजले. उरलेसुरले घरी नेऊन ते वाळविता येईल, तर त्याचीही सोय नाही. कारण वहिवाटीच्या रस्त्यात २-३ फुटांचे खोल खड्डे. त्यात चिखल साचल्याने त्यातून ना बैलगाडी नेता येत, ना ट्रॅक्टर चालत. त्यामुळे नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी पुरता बेजार झाला आहे.शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तालुक्यातील अनेक गावांचे सर्वेक्षण बाधित झाले आहे. त्यातील पहूर हे प्रातिनिधिक उदाहरण. पावसामुळे शेतात जाणारे पांदण रस्ते खराब झाले. कुजलेल्या सोयाबीनच्या गंज्या अजूनही शेतात पडून आहेत. ट्रॅक्टर वा बैलगाडी जात नसल्याने पहूर येथील शेतकरी मोहन पुरी यांना सोयाबीनची गंजी घरी आणता आलेली नाही. पद्माकर भेंडे यांनाही त्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात मळणी यंत्र व सोयाबीनचे पोते वाहून नेणारे ट्रॅक्टर चिखलात फसल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक झाली. पावसात भिजल्याने सोयाबीन खराब झाले. ते कवडीमोल भावाने बाजारात विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. कुजलेल्या सोयाबीनला दमट वास सुटला आहे. कपाशी पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन हे शेतकºयांचे मुख्य पीक असून, त्यावर त्यांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. ते कुजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाचे पथक अद्यापही पहूर व पंचक्रोशीत पोहोचलेले नाही.
वहिवाटीचे रस्ते चिखलात; सोयाबीनच्या गंज्या शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 1:34 PM
नांदगाव खंडेश्वर येथे सततच्या पावसात शेतातील कापून ठेवलेल्या गंज्या भिजल्याने सोयाबीन कुजले आहे.
ठळक मुद्देसंकट परतीच्या पावसाचे चिखलाने सर्वेक्षण बाधित