खाद्यतेलाचा फोटो वापरावा
पान २ चे लिड
चांदूर बाजार : पाम तेलावरील वाढलेले आयात शुल्क व शेंगदाण्याची होत असलेली निर्यात यामुळे खाद्यतेलाच्या दरात कधी नव्हे ती विक्रमी भाववाढ झाली आहे. जवस, शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आदी खाद्यतेलाचे दर गतवर्षाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी खाद्यतेलाचे दर आज गगनाला भिडले आहेत. अशातच लाॅकडाऊनचा फायदा घेऊन चढ्या भावाने होत असलेल्या विक्रीचा फटका ग्राहकांना बसत आहे.
तेलबियांबाबतचे राष्ट्रीय धोरण व व्यापाऱ्यांची नफेखोरी या दुहेरी चक्रात नाहकच ग्राहक म्हणून नागरिक भरडला जात आहे. खरे तर पामतेलाचे भाव इतर तेलापेक्षा खुपच कमी असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी १५ टक्के इतकेच आयात शुल्क होते. त्यात एकदम दुपटीने वाढ करण्यात आली. त्यामुळे पामतेलाच्या भावाने उचल घेतली. त्याच्या परिणामी देशांतर्गत इतरही खाद्यतेलांच्या भावावर झाला. मागील वर्षी ८० ते ९५ रुपये किलो असलेले सोयाबीन तेल यावर्षी १७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. सध्याच्या लाॅकडाऊन काळात काही ठिकाणी या तेलासाठी प्रतिकिलो ५ ते १० रुपये जादा मोजावे लागत आहेत. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सर्वाधिक सोयाबीन तेलाचाच वापर केला जातो. या तेलाच्या अमाप दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. खाद्यतेलाच्या आवाक्याबाहेरील भाववाढीने सर्वसामान्यांची होरपळ वाढली आहे. अशातच तेलबियांचे नवीन पीक बाजारात येण्यास अद्याप पाच महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पुढील पाच महिने तरी ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. असा किराणा व्यवसायिकांचा अंदाज आहे.
बॉक्स
तेल (प्रतिकिलो) : गतवर्षीचे दर (रु.) यंदाचे दर (रु.)
शेंगदाणा तेल : ११० ते १२० : १९० ते १९५
सूर्यफूल तेल : १३० : १८५ ते १९०
सोयाबीन : ८० ते ९५ : १७० ते १८०
कोट
कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात महागाईने गृहिणींची चिंता वाढविली आहे. काही महिन्यांच्या काळात खाद्यतेलाच्या भावात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. परिणामी काटकसर करावी लागत आहे.
- रिना कोंडे, गृहिणी, चांदूरबाजार
कोट २
गतवर्षापासून कोरोना व लाॅकडाऊनमुळे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक घडी चांगलीच विस्कटलेली आहे. अशातच कोरोनामुळे आरोग्यावरील खर्चात कमालीची वाढ झाली आहे. आवाक्याबाहेर गेलेली गॅस सिलिंडरची दरवाढ, त्याला खाद्यतेलांच्या दरवाढीचा तडका यामुळे जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शिल्पा लोणारकर, गृहिणी, चांदूर बाजार
कोट३
आयात होणाऱ्या खाद्यतेलावर देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव ठरतात. यावर्षी अमेरिका, मलेशिया येथील तेलबियांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे देशातही तेलबिया उत्पादनाला मोठा फटका बसला. पामतेलावरील आयात शुल्कातही वाढ करण्यात आली. ही दरवाढ अजून चार ते पाच महिने कायम राहील.
- राजाभाऊ नगरनाईक, खाद्यतेल व्यावसायिक