धामणगाव तालुक्यात पुन्हा निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील पाच गावांतील शिवारात पेरलेले बियाणे निघालेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी नोंदविल्या आहेत. अंजनसिंगी येथील साडेचौदा लाख रुपयांच्या प्रतिबंधित तणनाशक बीटी बियाणे प्रकरणातील आरोपी मोकाट असताना, आता अनेक कृषिसेवा केंद्रांतून शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट बियाणे मारले गेले.
धामणगाव रेल्वे तालुक्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात १५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचा पेरा केला आहे. यात मंगरूळ दस्तगीर मंडळातील सोनोरा काकडे, दिघी महल्ले, झाडा, आष्टा, शिदोडी, पेठ रघुनाथपूर या गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे निघाले असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यानी ज्या कृषिसेवा केंद्रांतून सोयाबीन बियाणे खरेदी केले, त्या कृषिसेवा केंद्रांच्या संचालकांनी तक्रारीकडे पाठ फिरवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि या प्रकरणात न्याय द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
-------------------
गतवर्षी पीक बुडाले
गतवर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिला. या पिकाचा एक दाणाही घरात आला नाही. आता पुन्हा सोयाबीन जमिनीतून उगवले नाही.
------------
धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांतून सोयाबीन निघाले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात पंचनामे करण्यात येणार आहेत.
- सागर इंगोले, तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे
.