अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील बियाणे आकोटसह शेजारच्या अन्य तालुक्यांचे शेतकरी नेत असल्याने काही दिवसांतच सोयाबीन बियाण्याची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे कृषिसेवा केंद्र संचालकांना शेतकऱ्यांना बियाण्याचे पैसे परत करावे लागले. परिणामी यावर्षी अकोट तालुक्यातील कृषिसेवा केद्र संचालकांनी सोयाबीन बियाणे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजनगाव सुर्जी तालुक्यातून सोयाबीन बियाणे घेऊन जात आहेत. परिणामी अंजनगाव सुर्जी तालूक्यात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासू शकते.
तालुक्यात दोन वर्षांपासून सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना झालेले नाही. मागील खरिपात सोयाबीन काढणीच्या वेळेला पाऊस आल्याने शेतकऱ्यांना घरचे बियाणे ठेवता आले नाही. परिणामी बियाण्यांची दरवाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी ३१०० रुपयांनी विकले जाणारे बियाणे ३७५० रुपयांवर गेले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले बियाणे येथील शेतकऱ्यांनाच मिळावे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी अश्विन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, अकोट तालुक्यातील शेतकरी सोयाबीन बियाणे नेत असल्याची बाब त्यांनी मान्य केली. परिस्थिती पाहून कृषिसेवा केंद्र संचालकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची ओळख पटवून बियाणे विक्री करावी, असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.