सोयाबीन पिकाचा विक्रमी पेरणी झाली, परंतु गतवर्षी बियाणे बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुबार पेरणी केली असता, पीक जोमात आले. परंतु, अतिपावसामुळे शेंगा आल्या नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. मूग व उडीद पिकालाही शेंगा आल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकट उभे झाले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दाभाडा, कावली, वसाड, शिदोडी, वाठोडा, चिंचपूर, जळगाव, गुंजी, अशोकनगर, गव्हा निपाणी, वाघोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी तूर व कपाशी या पिकांना अधिक पसंती दिली आहे. या तालुक्यांमध्ये अप्पर वर्धा धरणाचे पाणी येत असल्याने शेतकरी खरीप व रबी या दोन्ही हंगामात पेरणी करतात.
तालुक्यात बैलजोड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिक शेती करतात. मात्र, पेरणीसाठी मजूर हे लागतातच. त्यामुळे अधिक मजुरी देऊन कामे करून घ्यावी लागत असल्याचे गव्हा निपाणी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
परिसरात मोठ्या प्रमाणात पडीक जमीन होती. परंतु, गतवर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी त्या जमिनी खरेदी करून पेरणीयोग्य बनविल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.