लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा शहरातील सशस्त्र दरोड्याच्या १२ तासांआधीच पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना ‘अलर्ट’ दिला होता. एसपींनी सजग राहण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना बिनतारी संदेशाद्वारे दिल्या, नेमके त्याचवेळी परतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे हे दोन अधिकारी रजेवर गेलेत. एसपींच्या निर्देशानसार परतवाडा पोलीस सजग राहिले असते, तर कदाचित मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली असती, अशी शक्यता व्यक्त होत आहे.परतवाड्याच्या बसस्थानक मार्गावर कश्यप पेट्रोल पंपासमोर राहणारे विवेक मुरलीधर अग्रवाल यांच्या घरी दरोडा पडण्याच्या १२ तासांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. ३ मेच्या मध्यरात्री अज्ञातांनी वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक फोडून १४ लाख ८९ हजार २१४ रुपयांसह तिजोरी चोरून नेली होती. त्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ५ मे रोजी दुपारी सर्व ठाणेदार व पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना अलर्ट केले होते. सदर टोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचा गुन्हा किंवा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रगस्तीदरम्यान ग्रामीण भागातील बँक कार्यालये, एटीएम व इतर भागात सुरक्षा उपाययोजना चोख ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या संदेशाला १२ तास होण्यापूर्वीच परतवाडा शहरात सहा जणांनी दरोडा टाकून २१ लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेला दोन दिवस होऊ नसुद्धा पोलिसांना दरोडेखोरांचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान, एसडीपीओ पोपटराव अब्दागिरे हे रजेवरून परतले नाहीत, तर ठाणेदार राजेंद्र पाटील घटनेनंतर तडकाफडकी रुजू झाले.सहा वर्षांपूर्वी पडला होता दरोडापरतवाडा शहरातील वाघामाता संस्थान परिसरातील संजय अतकरे यांच्या निवासस्थानी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी दरोडा टाकून तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर, नागेश चतरकर यांनी अवघ्या आठ दिवसांत बुलडाणा जिल्ह्यातून मुख्य आरोपी दहिमन भोसलेसह पाच दरोडेखोरांना पकडले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी त्या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. अचलपूर सत्र न्यायालयात तारखेवर हजर करून परत येत असताना अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकातून, त्यातील एक आरोपी पोलिसांना चकमा देऊ न पसार झाला होता. तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
एसपी म्हणाले, ‘बी अलर्ट’ : ठाणेदार, एसडीपीओ गेले सुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:25 AM
परतवाडा शहरातील सशस्त्र दरोड्याच्या १२ तासांआधीच पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना ‘अलर्ट’ दिला होता. एसपींनी सजग राहण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना बिनतारी संदेशाद्वारे दिल्या, नेमके त्याचवेळी परतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे हे दोन अधिकारी रजेवर गेलेत.
ठळक मुद्दे-तर पोलिसांना सापडली असती दरोडेखोरांची टोळी