अमरावती : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित कार्यरत १४ पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ)ना यापुढे आठवडाभरात केल्या जाणाऱ्या तालुक्यातील संभाव्य दौऱ्याच्या माहितीची प्रत सादर करावी लागणार आहे. यासंदर्भात महिला व बालकल्याण सभापतींनी डेप्युटी सीईओंमार्फत निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा विविध विषयाला अनुसरून ९ जुलै रोजी सभापती पूजा आमले यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या नियमित होणाऱ्या आरोग्य तपासणीची माहिती सभापतींनी जाणून घेतली. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेपैकी शिलाई मशिन, सायकलीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश यावेळी महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आले. मेळघाटात लॉकडाऊन काळातील पोषण आहार बालकांना नियमित दिला जातो काय, याचीही माहिती बैठकीत घेण्यात आली. समिती सदस्यांनी विविध मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सभेला विनापरवानगी गैरहजर असलेल्या सीडीपीओंना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचना डेप्युटी सीईओंना देण्यात आल्या. यावेळी समिती आशा वानरे, चक्रे, भारती गेडाम, वनवे, वंदना थोटे, महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.