नांदगाव खंडेश्वर : घरकुल लाभार्थींना जागांच्या बक्षीसपत्रासाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुक्यातील ४५ लाभार्थींचे बक्षीसपत्र तयार करून त्यांना वितरित करण्यात आले तसेच २० नोंदणी अर्ज दाखल झाले आहेत.
‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी विशेष उपक्रम राबवून घरकुलासाठी पात्र असलेल्या, परंतु जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थींच्या घरी गृहभेटी दिल्या. ‘घरकुलाची वारी, प्रशासन लाभार्थीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत जागा नसलेल्या, घरकुलास पात्र लाभार्थींना नेमण्यात आलेल्या घरकुलदूतामार्फत ई-वर्ग, एफ-वर्ग जागा मागणी, रक्ताच्या नातेवाइकांकडून बक्षीसपत्र व पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नातेवाइकाकडून बक्षीसपत्राद्वारे फेरफार घेऊन जागा उपलब्ध करून देण्यासाठी २७ ते २९ मार्च दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता ग्रामपंचायतचे संगणक परिचालक हे बक्षीसपत्राचे दस्त तयार करून देत असून, फक्त सहाशे रुपयांत दस्ताची नोंदणी करण्यात येत आहे.
उपक्रमात गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठलराव जाधव, विस्तार अधिकारी संदीप देशमुख, विजय कावळे, उमेश भोंडे, व्यंकटेश दुरतकर, हितेश लांडे, विकी रत्नपारखी, मनीष मदनकार, अक्षता जळीत, गजानन देऊळकर, महेंद्र गांडोळे यांचे सहकार्य लाभले.