अमरावती : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांकडून स्पेशल ड्राईव्ह राबविला जात आहे. त्या मालिकेत रविवारी गाडगेनगर पोलिसांनी नवसारीस्थित महात्मा फुले नगरातील एका दुकानातून सुमारे ३३ हजार रुपये किमतीचा नॉयलॉन मांजा जप्त केला.
मकर संक्रातीला काही लोक पंतग उडविण्याकरीता प्रतिबंधित व पर्यावरणास घातक असलेला नायलॉन चायना मांजाचा वापर करतात. त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होवून नागरिकांच्या तसेच पशु पक्ष्यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो, या घटनांना आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या निर्देशानुसार विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान नॉयलॉन चायना मांजा विक्री करणारे व्यक्तींवर गुप्त बातमीदारांकरवी पाळत ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, १४ जानेवारी रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास गाडगेनगर ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना महात्मा फुले नगर येथे हरिओम जनरल स्टोर्समध्ये बरेच ग्राहक, युवक पतंग, मांजा, रिल्स खरेदी करण्याकरीता उभे असलेले दिसले. पोलिसांनी मोहन ठाकरे यांच्या त्या दुकानात प्रवेश करुन झडती घेतली असता दुकानामध्ये नविन पतंगाचे गठठे, वेगवेगळया बनावटीचे पतंगी, तसेच नायलॉन मांजाचे ४८ रिल आढळून आले. ते जप्त करून ठाकरेविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीपी पुनम पाटील व ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात टिम गाडगेनगरचे ही कारवाई केली. शनिवारी देखील गुन्हे शाखा युनिट दोन व नांदगाव पेठ पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला.