अमरावती : अंतिम वर्षाच्या परीक्षेपासून काही कारणास्तव ‘वंचित’असलेल्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांची २ ते ४ डिसेंबर यादरम्यान विशेष परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचे शनिवारपासून मूल्यांकन करण्यात येणार आहे. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होताच निकाल जाहीर केले जाणार आहे.
विद्यापीठाने ‘वंचित’ विद्यार्थ्यांची माहिती गुगलफार्मद्धारे गोळा केली होती. त्यानंतर अंतिम वर्षाचे परीक्षांचे नियोजन महाविद्यालयस्तरावर करण्यात आले. यात पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांद्धारे ही परीक्षा घेण्यात आली. महाविद्यालयात ई-मेलवर तासाभरापूर्वी प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठविण्यात आल्यात. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेवर परीक्षा क्रमांक, महाविद्यालयांचे नाव, सांकेतांक क्रमांक आणि विद्यार्थ्यांचा भ्रमणध्वनी ही माहिती अनिवार्य करण्यात आली होती. महाविद्यालयांना ऑफलाईन उत्तरपत्रिका व ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचे गुण शनिवारपर्यंत विद्यापीठात पाठवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होताच विशेष परीक्षांचे निकाल दोन ते तीन दिवसांत जाहीर केले जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लाेकमत’ला दिली.