अमरावती : महानगरासाठी इयत्ता अकरावी प्रवेशाची विशेष फेरी २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविली जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश नोंदणी २७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता बंद झाली आहे. २९ डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. शासननिर्णयानुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या तीन प्रवेशफेऱ्या आटोपल्या आहेत. अगोदर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे अकरावी प्रवेशाला स्थगिती देण्यात आली होती. आता यामध्ये एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. अकरावीसाठी चारही शाखांसाठी एकूण १५ हजार ३६० प्रवेशक्षमता आहे. त्यापैकी ८३०५ जागांवर प्रवेश निश्चित झाला असून, ७०५५ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.
--------------------
अशी आहे प्रवेशाची स्थिती
शाखा प्रवेश क्षमता प्रवेश रिक्त जागा
कला ३३७५ १०५८ १६१७
वाणिज्य २४२५ १४६० ९६५
विज्ञान ६५४० ४२६० २२८०
एमसीव्हीसी ३०२० ८२७ २१९३