- गणेश वासनिकअमरावती, दि.11- एरवी फक्त भीक मागण्यासाठी पसरणारे हात आणि माथ्यावर ‘चोर’ असल्याचा शिक्का घेऊन उघड्यावर जगणारी पारधी समाजातील ४५० मुले चक्क स्वकौशल्याचा वापर करून टिपऱ्या बनवीत आहेत. ‘दांडिया’शी दूरदुरचा संबंध नसला तरी, 'आम्ही बनविलेल्या टिपऱ्या विकत घ्या आणि दांडिया एन्जॉय करा', अशी विनवणी ही मुले लोकांना करीत आहेत. पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प घेतलेल्या मतीन भोसले यांच्या मंगरूळ चव्हाळा गावातील ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत हे चिमुकले हात सद्यस्थितीत टिपऱ्या बनविण्यात व्यस्त झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे सन २०१२ पासून ‘प्रश्नचिन्ह’आश्रमशाळा लोकवर्गणीतून चालविली जात आहे. राज्य शासन ‘प्रश्नचिन्ह’ला अनुदान देईल, ही आशा आजही मतीन भोसले यांना आहे. मात्र, राज्यासह अन्य प्रांतातून आश्रमशाळेत आणलेल्या फासे पारधी समाजाच्या मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत. आश्रमशाळेतील फासे पारधी समाजाची मुले वाममार्गाला लागू नयेत, ही त्यांची तगमग आहे.
२१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून नऊ दिवस अमरावती जिल्ह्यात दांडियाची धूम असते. त्यामुळे हा उत्सव ‘कॅश’ करून पारधी मुलांना रोजगार देण्याची संधी मतीन भोसले यांनी हेरली आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाच हजार टिपऱ्या पारधी मुलांनी तयार केल्या आहेत. टिपऱ्यांसाठी लागणाऱ्या काड्या सातपुडा पर्वत रांगेतील देवकाळी वृक्षांच्या फांद्यापासून बनविल्या जात आहेत. या मुलांना टिपºया तयार करण्याचे प्रशिक्षण मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अजय किंगरे यांनी दिले आहे.
शाळा सांभाळून टिप-या बनविण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. आश्रमशाळेला अनुदान नसल्याने पारधी मुलांना दोन वेळेचे जेवण कसे देता येईल, याचे नियोजन करण्यासाठी मतीन भोसले यांनी टिप-या बनविण्याचा पर्याय निवडला आहे. दांडियाची एक जोडी ५० रुपयांना विकली जात आहे. रासगरबा खेळा पण टिपऱ्या घेणार असाल तर आमच्याकडून विकत घ्या, अशी भावनिक साद फासेपारधी मुला-मुलींनी घातली आहे.
कोण आहेत मतीन भोसले ?मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी समाजातील मुला, मुलींच्या शिक्षणासाठी ‘प्रश्नचिन्ह’ नामक आश्रमशाळा स्थापन करून राज्यभरात प्रसिद्ध झालेले मतीन भोसले पूर्वी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. परंतु फासेपारधी समाजाची दैनावस्था बघून ते हताश झाले. या समाजातील मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याच्या वेडाने त्यांना झपाटले. त्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. आणि फासेपारधी मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेतला. अखेर रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉटेल, भंगार वेचणाºया फासेपारधी मुला, मुलींना त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत आणले. ही आश्रमशाळा आजही ते लोकवर्गणीतून चालवित आहेत