अपेक्षांना पालवी फुटली : अंजनगाव सुर्जी तालुक्याचा अचलपुरात समावेश ! अंजनगाव सुर्जी सुदेश मोरे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे. यासाठी मंत्रिगट समिती कार्यान्वित झाल्याने अपेक्षांना पालवी फुटली आहे. विदर्भात नव्याने आठ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. विशाल जिल्हा क्षेत्रामुळे मुख्यालयापासून दूरवरच्या गावकऱ्यांना कामकाजात अडचणीत येतात व एकाच दिवशी ते काम करून घरी जाऊ शकत नाहीत. आणि यंत्रणासुद्धा जिल्ह्याच्या आवाक्यामुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन विदर्भात नवीन आठ जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रालयातील अतिरिक्त महसुली सचिवांच्या अध्यक्षतेत एका समितीने याबाबतचा अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला. यात नवे जिल्हे निर्मितीची शिफारस अपेक्षित आहे. नागपूरमधून काटोल, चंद्रपूरमधून चिमूर व ब्रह्मपुरी, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, गडचिरोलीतून अहेरी, वर्धामधून आष्टी व अमरावतीतन अचलपूर असे आठ जिल्हे फडणवीस शासनाने वेगळे करण्याचे ठरविले. राजकीय गणिते बदलण्याची शक्यता जिल्हा हे कार्यक्षेत्र मानून नेत्यांनी आपली कामकाजाची दिशा निश्चित केली आहे. पण नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे अशा नेत्यांना आपल्या कामाचीही दिशा बदलावी लागेल. सोबतच त्यांचे विशिष्ट कार्यशैलीमुळे जिल्हाभर लाभलेल्या कार्यकर्त्यांपासून वंचित राहावे लागेल. राजकारणात अनेक वर्षांपासून मेहनतीने बांधलेल्या आराखड्यांना मुकावे लागेल. संकुचित झालेल्या जिल्हा क्षेत्रामुळे अनेक नेत्यांची राजकीय गणितेसुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. नव्या जिल्ह्यांसोबत ७० नवे तालुके विदर्भातील आठ जिल्ह्यांसह राज्यात एकूण बावीस जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे एकूण सत्तर नव्या तहसिली निर्माण होतील. यामुळे नवे रोजगार व नोकरीच्या नव्या संधीसुद्धा निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचे हे की, जनतेला आपल्या मुख्यालयी पोहोचणे सहज सुलभ होईल. अधिक सोयीसुविधा आणि विकासकामांनासुद्धा चालना मिळेल.
आठ जिल्ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग
By admin | Published: January 03, 2016 12:47 AM