अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला ‘खावटी’ दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने डीबीटी पोर्टलवर नोंदणीला वेग आला असून, दोन हजार रुपये अनुदान आणि दोन हजार रुपयांचे जीवनाश्यक साहित्य लाभार्थींच्या घरी पोहोचून दिले जाईल, आदिवासी विकास विभागामार्फत नव्या वर्षात या योजनेचा लाभ मिळेल, असे नियोजन चालविले आहे. अमरावती विभागाची लक्ष्यांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
गत महिन्यात आदिवासी समाजाच्या काही संघटनांनी ‘खावटी’मधून साहित्य वाटप न करता थेट चार हजार रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी आदिवासी विकास महामंडळाकडे केली होती. मात्र, यासंदर्भात तसे कोणतेही शासनादेश नाही. दोन हजारांचे अनुदान आणि दोन हजारांचे साहित्य असेच ‘खावटी’चे स्वरूप असेल, अशी माहिती महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शासनाने आदिवासी समाजासाठी ‘खावटी’ योजना १२ ऑगस्ट २०२० रोजी मंत्रिमंडळात लागू केली. याबाबत ९ सप्टेंबर रोजी शासनादेश जारी झाला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. ‘खावटी’साठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून, यात वैयक्तिक वनहक्क लाभधारक, आदिम जमात, पारधी, मनरेगा लाभार्थी आणि जनगणनेची आकडेवारी असलेल्या आदिवासींना लाभ मिळणार आहे.
‘खावटी’ योजनेची ग्रामसभेने यादी मंजूर केल्यानंतर प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त आणि त्यानंतर आयुक्तांकडे अंतिम मान्यतेसाठी ही यादी मंजुरीसाठी जाणार आहे. त्यानंतरच लाभार्थींच्या खात्यात थेट दोन हजारांचे अनुदान जमा होईल, असे नियोजन चालविले आहे. ‘ट्रायबल’च्या अमरावती विभागात १ लाख ९८ हजार लाभार्थी लक्ष्यांक असून, आतापर्यंत १ लाख ६२ हजार ३४३ एवढी डीबीटीसाठी पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.
प्रकल्पनिहाय ‘खावटी’चे लक्ष्यांक
प्रकल्पाचे नाव लक्ष्यांक नोंदणीअकोला ३०००० २४६८४
पुसद २८५०० १६७५३पांढरकवडा ५७००० ४८९८९
धारणी ४५००० ३३७१८कळमनुरी १६५०० १३४८९
किनवट ३०००० १५११८औरंगाबाद २१००० ९७६७
आदिवासी समाजासाठी ‘खावटी’ योजना लाभदायक ठरणारी आहे. या योजनेत पारदर्शकता असावी, यासाठी थेट लाभार्थींच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील. अमरावतीने लक्ष्यांकांकडे वाटचाल सुरू केली आहे.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.