अमरावती : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच सत्रात सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अमरावती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी असलेल्या डॉ. अनिल बत्रा यांनी मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी डॉ. बत्रा यांना संपूर्ण रुग्णालयाची माहिती दिली, तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.
डॉ. बत्रा यांना महाविद्यालयाच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा ताब्यात घेणे, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक प्रमाणपत्र मिळविणे, तसेच महाविद्यालयाला मान्यता मिळविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज करणे यासारखी कामे ही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने डॉ. अनिल बत्रा यांनी मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्याशी चर्चा केली, तसेच ते बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचीदेखील पाहणी करणार आहेत. यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने सदरचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.