लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला शहरात व ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक वगळता सर्व सेवा दुपारपर्यंत ठप्प होत्या. महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी केले होते. यामध्ये आमदार सुलभा खोडके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमूख, माजी खासदार अनंत गुढे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे, हरिभाऊ मोहोड, शरद देवरणकर, पराग गुडधे, राजेंद्र महल्ले, सुनील खराटे, नाना नागमोते, गटनेता भारत चौधरी, प्रशांत वानखडे, नीलेश गुहे, रिना नंदा, अविनाश मार्डीकर, प्रकाश बोंडे, संतोष महात्मे, ज्ञानेश्वर धाने पाटील, नंदकिशोर शेरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किसान संघर्ष समन्वय समितीद्वारा मंगळवारी सकाळी १० वाजता इर्विन चौकातून डाव्या आघाडीचे घटकपक्ष व काही सामाजिक संघटनांद्वारे निषेध रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडी, आप, भाकप, माकप आदींचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, सिद्धार्थ गायकवाड, जे.एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे यांच्यासह विविध पक्षांचे पदधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुख्य बाजारपेठ बंदशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व बंदला सहकार्य करण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील सर्व मार्केट बंद होते. मात्र, अंतर्गत भागातील काही दुकाने सुरु होती. सकाळी १२ पर्यंत ऑटोरिक्षा सेवा विस्कळीत झालेली होती. सिटीलॅन्ड, बिझिलॅन्ड व्यापारी संकुल बंद होते.
बस सेवा विस्कळीतबंददरम्यान महामंडळाची एकही बसही आगारातून सुटली नाही. काही संघटनांनी आंदोलनास सहकार्य करण्याचा ठराव केला होता. याव्यतिरिक्त अन्य आगारांतील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली, खासगी ट्रॅव्हल्सदेखील सकाळपासून बंद होत्या.
नवीन कृषिकायद्यांना मराठा क्षत्रियांचा विरोधकेंद्र सरकारच्या नवीन कृषिकायद्यांना कडाडून विरोध दर्शवित पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मराठा क्षत्रियांनी समर्थन जाहीर केले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निखील देशमुख, रामेश्वर कापसे, उत्तरा देशमुख, शीतल वाघमारे, गौरव पवार आदी उपस्थित होते.