लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते. ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत वेदप्रताप वैदिक यांच्या मार्गदर्शनाने जणू चैतन्य संचारल्याचा अनुभव आला.अमरावतीच्या हिंदी महासंघातर्फे आयोजित कविसंमेलनात वेदप्रताप वैदिक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनाला प्रारंभ झाला. ओमपालसिंह निडर, सुनील समैया, कपिल जैन, कर्नल बी.पी. सिंह, सुचिता मिश्रा, माधुरी शबनम आदींनी एकापेक्षा एक हास्य, वीररस आणि गजल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्थानिक कवी किरण जोशी यांच्या निवेदनाने कविसंमेलनात प्राण फुंकला. नागपूर येथील कवियत्री सुचिता मिश्रा यांनी ‘आशिष दे मां शारदे’ या ओळीने सरस्वती वंदना सादर केली. त्यानंतर सुनील समैय्या यांनी सादर केलेल्या कवितेने हास्याचे फवारे उडाले. ‘जितने बम बारूद पाकिस्तान तेरे तहखाने मे है, उतने प्रतिवर्ष फोड डालते है हम दीपावली मै’ या कवितेतून त्यांनी भारतवासीयांची प्रतिमा जगासमोर कशी आहे, हे पटवून दिले. ‘हर दिशा में वहां देंगे गंगो जमन रक्त से हम सिचेंगे चमन, हम जिएंगे, मरेंगे तुम्हारे लिए ये वतन- ये वतन तुझको शत् शत ्नमन’ ही देशाप्रती भावना असलेली कविता सादर केली. किरण जोशी यांनी ‘यहां ताजी मिठाईयां मिलती है’ ही ज्ञानावर आधारित कविता सादर करताना कोण, कसे विचार लादतात, अशा भावप्रधान ओळी त्यांनी सादर केल्यात. माधुरी शबनम यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. ‘आंधिया साथ लेकर चलती हूं, बिजलियां साथ लेकर चलती हूं और मुझको खतरा नहीं जमाने से, राखियां साथ लेकर चलती हूं’ ही व्यंग कविता भरपूर भाव खावून गेली. त्यानंतर शबनम यांनी देशभक्ती, प्रेम आदी विषयांवर गजल सादरीकरणाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या कविसंमेलनातून राजकारण, समाजकारण, देशभक्ती, प्रेम, शत्रू राष्ट्रांचे धोरण, जातीयवाद आदी प्रश्न, समस्यांविषयी कविता सादर करून व्यवस्थेचा खरपूस समाचार घेतला. कवि संमेलनाला माजी महापौर चरणजित कौर नंदा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया, संजय अग्रवाल, पवन जाजोदिया, माधुरी सुदा, रामेश्वर अभ्यंकर, राधा कुरील आदी उपस्थित होते.
हिंदी महासंघाच्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:47 AM
येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते.
ठळक मुद्देसांस्कृतिक भवन हाऊसफुल्ल : वेदप्रताप वैदिकांच्या मार्गदर्शनाने चैतन्य संचारले