परतवाडा : शहरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या १३१ लोकांची प्रशासनाकडून दोन दिवसात ऑन दि स्पॉट कोरोना चाचणी केली गेली. यात तिघांची टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांची रवानगी कोविड रुग्णालयात करण्यात आली आहे.
तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्त्वात महसूल प्रशासनासह पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभाग संयुक्तपणे ऑन दि स्पॉट कोरोना चाचणी उपक्रम राबवित आहेत. याकरिता त्यांनी फिरते स्वॅब संकलन केंद्र तैनात केले आहे. विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांना प्रशासकीय पथक पकडून शहरातील निर्धारित चौकात गोळा करून आरोग्य विभाग त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करीत आहे. १८ एप्रिल रोजी शहरातील जयस्तंभ चौकात एकूण ६१ लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली गेली. यातील दोन लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली आहे, तर सोमवार, १९ एप्रिल रोजी चिखलदरा स्टॉपवर ७० लोकांची अँटिजेन टेस्ट केली गेली. यात १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.