अमरावती : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. ते गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, गत एप्रिल महिन्यात ३१ ते ४५ वयोगटातील ३० युवकांचा कोरोनाने मृत्यू झाला, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. सावधगिरी बाळगणे, काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणे कठीण होईल, असे ते म्हणाले. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात तीन हजार तर, शासकीय रुग्णालयात १५०० इंजेक्शन आहेत. त्यामुळे निश्चित दरानुसारच रेमडेसिविर उपलब्ध आहे. जर कोणी चढ्या दरात रेमडेसिविर देत असेल तर, थेट माझ्याशी संपर्क साधा ते खरे आढळल्यास संबंधितावर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. रेमडेसिविरप्रकरणी पाच रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. पथकाचा अहवाल अप्राप्त असून, लवकरच याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, औषधसाठा पुरेसा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चार दिवस पुरेल एवढा रेमडेसिविरचा साठा आहे. एमआरपी दरानेच रेमडेसिविर घ्यावे, कुणी जादा पैसे मागितल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी नागरिकांना केले.
------------------------
गावस्तरावर कोरोना संक्रमणमुक्त समिती
संचारबंदी २२ मेपर्यंत आहे. कोरोना संक्रमण कायम असून, ग्रामीण भागात त्याचा मोठा उद्रेक आहे. परिणामी गाव स्तरावर कोरोना संक्रमण मुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. अद्यापही ५१ टक्के गावांत कोरोनाचा उद्रेक आहे. कोरोना संक्रमण मुक्त गाव करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात गावकऱ्यांनाच त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार असून, आवश्यक त्या उपाययोजना करून गाव संक्रमण मुक्त केले जाईल, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
--------------
कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धत
येत्या काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा खरेदी, पीक कर्जासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. वेळेत कृषी निविष्ठा मिळेल, त्याअनुषंगाने कृषी केंद्रांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. टोकन पद्धतीचा अवलंब करून गर्दी टाळण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले.