अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनुदानित, अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न, समस्या ‘ऑन दी स्पॉट’ सोडविण्यात आल्या. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उच्च शिक्षण सहसंचालकांनी राबविलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद होती. महाविद्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या कायम होत्या. त्यामुळे गत १० महिन्यांपासून प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली. उच्च शिक्षण प्रशासन महाविद्यालय दारी हा उपक्रम राबविण्यात आला. यात अमरावती विभागातील अनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रश्न, समस्यांचे पाठविलेले प्रस्ताव, प्रलंबित समस्या जागेवरच निपटारा करण्यात आले. यात सातव्या वेतन आयोगानुसार प्रकरणे, अनुकंपा नियुक्ती, कॅस अंतर्गत प्रकरणे, सेवानिवृत्तीचे प्रकरणे, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, अर्जित रजा, वैद्यकीय देयकांचे प्रकरणे आदींचा समावेश होता. उच्च शिक्षण विभागाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार अमरावती विभागातून ६५० कर्मचाऱ्यांच्या समस्या जागेवरच सोडविल्याची माहिती उच्च व शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.