कॅप्शन - धारणी येथील न्यायालयात श्रीनिवास रेड्डीला हजर करताना पोलीस पथक. (छाया - पंकज लायदे, धारणी)
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोना चाचणी
परतवाडा/धारणी : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी नागपूर येथून बुधवारी अटक करण्यात आलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला गुरुवारी दुपारी १ वाजता धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
गुरुवारी पहाटे श्रीनिवास रेड्डी याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांनी चार तास चौकशी करून न्यायालयीन कागदपत्रे तयार केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, ठाणेदार विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर, मंगेश भोयर, सचिन होले, अरविंद सरोदे यांच्या तगड्या बंदोबस्तात श्रीनिलास रेड्डीला गुरुवारी दुपारी धारणी न्यायालयात हजर केले. सरकारची बाजू बी.एम. भगत यांनी मांडली. त्यांच्यातर्फे सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दोन्ही आरोपींना नागपूरहून अटक
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा पळून जात असताना, त्याला नागपूर रेल्वे स्थानकाहून २६ मार्च रोजी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. बुधवारी श्रीनिवास रेड्डी यालाही नागपूर येथूनच अटक करण्यात आली.
बॉक्स
अन् रेड्डी हादरला
श्रीनिवास रेड्डीला पोलीस कोठडीतून पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीत पोलिसांनी चौकशीकरिता नेले. पुढे काय होईल, या भीतीपोटी तो थरथरत होता.
कोरोना तपासणीनंतरच न्यायालय कक्षात प्रवेश
श्रीनिवास रेड्डी याला पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर कोरोना तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याला बाहेर काढण्यात आले व कोरोना तपासणीकरिता धारणीतील कोविड केअर सेंटरवर नेले. तेथे त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा
तपास अधिकारी पूनम पाटील यांनी विनोद शिवकुमार व मृत वनाधिकारी दीपाली चव्हाण यांचे घर व कार्यालयातून तपासकामी जप्त केलेली कागदपत्रे व लॅपटॉप, मोबाईल यावरून सतत चौकशी सुरूच ठेवली होती. चौकशीवरून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी हादेखील आरोपी निष्पन्न झाला. यामुळे मुख्य आरोपी विनोद शिवकुमार बाला याच्याविरुद्ध दाखल केलेल्या भादंविचे कलम ३०६ मध्ये ४ एप्रिल रोजी ३१२, ५०४, ५०६ या कलमा वाढवून श्रीनिवास रेड्डीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
बॉक्स
धारणी पोलिसांत ६ वाजता अटक केल्याची नोंद
श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ४.३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालातमध्ये टाकले. त्याला तेथेच अंथरूण-पांघरूण देण्यात आले. धारणी पोलिसांत सकाळी ६ वाजता अटक केल्याची नोंद करण्यात आली.