१४ दिवस राहावे लागेल क्वारंटाईन, व्हीआयपी लवाजामा संपला, सामान्य कैद्यासारखी वागणूक
अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे. धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे यांच्या नायालयाने १ मे रोजी रेड्डींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत रेड्डी हे मध्यवर्ती कारागृहाच्या नियंत्रणात राहणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. त्यानुसार रेड्डी यांना येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याची नियमावली आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी कार्यरत असताना रेड्डी यांचा रूतबा, दरारा काही औरच होता. त्यांचा आदेश हा वनाधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शिरसावध असायचा. मात्र, दीपाली प्रकरणात रेड्डी यांना २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून धारणी पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार रेड्डी यांचे दोन दिवस धारणी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच गेले. मात्र, पोलीस कोठडी संपताच न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आणि रेड्डी यांची थेट कारागृहात रवानगी झाली. येथील अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात शनिवारी सायंकाळच्या सुमारास रेड्डींना आणण्यात आले. आता रेड्डींना येथे सामान्य कैद्यासारखे राहावे लागणार आहे. जेवण, पाणी हे स्वत:च्या हाताने घ्यावे लागेल. आता ‘ना नाेकर, ना चाकर’ केवळ कैदी म्हणून येथे बंदिस्त आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त दिनचर्या ही रेड्डींना अन्य बंदीजनांसारखी घालवावी लागत आहे.
---------------
शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: वर्ण तपासले
न्यायालयाच्या आदेशानुसार धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डींना येथील अंध विद्यालयात साकारलेल्या तात्पुरत्या कारागृहात बंदीजन म्हणून आणले. कारागृहाचे शिपाई, हवालदार यांनी न्यायालयीन आदेश बघितल्यानंतर रेड्डींची कारागृहाच्या रेकॉर्डवर आराेपी म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: असलेले वर्ण आदींंची बारकाईने तपासणी करताना तशा नोंदी घेतल्या. त्यानंतर जेवणासाठी ॲल्युमिनियमचे ताट आणि पाणी पिण्यासाठी ग्लास देण्यात आले. सामान्य कैद्यासारखे रविवारी रांगेत उभे राहून सकाळचे जेवणदेखील रेड्डींनी घेतले, अशी माहिती जेल सूत्रांकडून मिळाली आहे.
-------------
कारागृहात आराेपी म्हणून येणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्यासाठी समान असते. मग ती राजकीय असो, अधिकारी असाे, वा व्हीआयपी त्यांना कैदी म्हणून समान वागणूक दिली जाते. श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी सायंकाळी उशिरा आणले गेले. अंध विद्यालयात तात्पुरत्या कारागृहात सामान्य कैद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सीसीटीव्ही कॅमेेरे बसविले आहेत.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती