अनोखे रक्षाबंधन : इनरव्हील क्लबचाही सहभाग, जवान भावूक झाले अमरावती : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. हा सण लोकमत सखीमंचच्या सदस्यांनी एसआरपीएफ जवानांच्या हातावर राख्या बांधून साजरा केला. यासाठी सर्व सखी वडाळी कॅम्पमध्ये एकत्र जमल्या होत्या. हा कार्यक्रम गुरूवारी पार पडला. लोकमत सखीमंच व इनर व्हील क्लब आॅफ अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. वडाळी कॅम्पमधील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ च्या जवानांना सखींनी राख्या बांधल्यात. या गटाचे प्रमुख समादेशक जी.बी.डाखोरे, पोलीस निरीक्षक घोडके, माळी, चव्हाण व गटातील सगळे सदस्य यावेळी उपस्थित होते. सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणाऱ्या राख्या यावेळी समादेशक जी.बी.डाखोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्यात. यावेळी भावना कुदळे, विणा दुबे, माधवी काळे, ज्योती बोकडे, मंदा कदम या सखींनी रक्षाबंधन कार्यक्रमाची सुरूवात केली. येथील जवान जर्नादन मानवटकर यांच्या मनगटावर २० वर्षांनंतर पहिल्यांदा राखीचा धागा बांधला गेला. उपरोक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने हा योग साध्य झाला. त्यांना सखीमंच सदस्य छाया औघड यांनी राखी बांधली. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मंजू राठी, सुरेखा लुंगारे यांनी विचार व्यक्त केलेत. भारती क्षीरसागर यांनी सादर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों...’ या गीताने कार्यक्रमात वेगळीच देशभक्तीची आभा पसरवली. सर्व सखींच्यावतीने सखीमंच संयोजिका स्वाती बडगुजर यांनी विचार व्यक्त केलेत. संचालन प्रीती गवई यांनी केले. (प्रतिनिधी)
सखींनी बांधल्या एसआरपीएफ जवानांना राख्या
By admin | Published: August 19, 2016 12:15 AM