अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) ‘अ प्लस’ श्रेणी गाठण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. त्याकरिता विद्यापीठाने सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) ‘नॅक’कडे पाठविला आहे. विद्यापीठाने ‘नॅक’साठी पहिला टप्पा गाठला असून, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चमू येईल, असे संकेत आहेत.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’
मू्ल्यांकन होऊन ‘अ प्लस’ श्रेणी मिळावी, यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. प्र-कुलगुरू राजेेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता अविनाश मोहरील आदींच्या नियंत्रणात अधिकारी ‘नॅक’ मूल्यांकनासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. गत आठवड्यात शुक्रवारी सिनेट सभागृहात विभागप्रमुख, अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात नॅक मूल्यांकनाच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यात आला. एसएसआर पाठविल्यानंतर ही महत्त्वपूर्ण बैठक ठरली आहे. हल्ली विद्यापीठ ‘नॅक’च्या ‘अ’ श्रेणीमध्ये असून, आता ‘अ प्लस’ मिळविण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करण्यात येत आहे. कोरोनाकाळातही ‘नॅक’ संबंधित अधिकारी, प्राधिकरणाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठाने ऑनलाईन कामकाज, सुविधावर भर दिला आहे. दर पाच वर्षांनी महाविद्यालय, विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूकडून हे मूल्यांकन केले जाते. तत्पूर्वी, शैक्षणिक संस्थांना दिल्ली येथे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठवावा लागतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे तयारी करताना व्यत्यय येत आहे.
--------------
विद्यापीठाने एसएसआर पाठविला असून, तो यूजीसीने ग्राह्य धरला आहे. त्यामुळे नॅकची चमू लवकरच येणार आहे. मे महिन्यात विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन होण्याचे संकेत आहे.
- अविनाश माेहरील, अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.