अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शनिवारपासून जिल्हाभरातील अत्यावश्यक प्रवासी वाहतूक वगळता अन्य प्रवाशांची वाहतूक सेवा बंद केली आहे. मात्र, त्याची पूवर्वसूचना न मिळाल्याने मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यातील काही एकटे, तर काही कुटुंबासह प्रवासाला निघाले होते. कोरोना संसर्गाची लाट थोपविण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा शासनाने ‘ब्रेक द चेन’मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ते पुन्हा आत येऊ नये, यासाठी दोन्ही प्रवेशद्वार काही वेळेसाठी लावून घेण्यात आले होते. ध्वनिक्षेपकावर यानंतर सूचना देण्यात येत होत्या. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक केली जाणार असल्याचे सूचना फलकावर नमूद केले. अन्य आठ अगारांतूनही केवळ अत्यावश्यक व निकडीच्या वेळीच एसटी बस सोडण्यात येत असल्याचे महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हांतर्गत तसेच जिल्हाबाहेर सोडण्यात येणाऱ्या जवळपास दीड हजारांवर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
एसटी बसेसची सेवा अचानक बंद, प्रवाशांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 5:00 AM