अमरावती : एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुढे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे अद्यापही अनेक गावात बसेस सुरू नाही. त्यामुळे गावात बस कधी येणार, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.
चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही हा संप मिटलेला नाही. परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार १२३ बस विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त बस बंद आहेत आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत.
ग्रामीण भागातील एसटी बंदच
मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
४५० जण बडतर्फ
वारंवार आवाहन करूनही कामावर हजर न झालेल्या ४५० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी अपील करून कामावर हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एसटी महामंडळ विलीनीकरणाची शक्यता आता संपुष्टात आली आहे. विलीनीकरण होणार नसल्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर झाले पाहिजे.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक
आंदोलक कर्मचारी काय म्हणतात?
चार महिन्यांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला वाटले होते की, विलीनीकरण होईल, परंतु तसे झाले नाही. आमचा लढा सुरू राहणार आहे. ५ एप्रिल रोजी यावर न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.
- संजय मालवीय, संपकरी एसटी कर्मचारी
आम्ही गेल्या चार महिन्यांपासून विलीनीकरणासाठी आंदोलन करीत आहोत. आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. शासनाने आमचा विचार करून विलीनीकरण द्यावे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील.
- सतीश कडू, संपकरी एसटी कर्मचारी