अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने सर्वाधिक धोका एसटीच्या चालक, वाहकांना करावा लागत आहे. रोज प्रवाशांशी संबंध येत असल्याने चालक-वाहक यांच्यातही कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीसाठी त्यांचा प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोरोना काळात एसटी महामंडळाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला. दैनंदिन उत्पन्न घटले, दर महिन्याला होणाऱ्या वेतनात अनिश्चितता आली. महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न गांभीर्याने समोर आला आहे. मागे कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ७० टक्के बसेस धावत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा सुरू आहे. प्रवाशांकडूनदेखील प्रतिसाद मिळत असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील आठ आगारांतून ५०० पेक्षा अधिक बसेस सुरू असून, दीड हजारांवर चालक-वाहक सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. बसस्थानकापासून ते गावखेड्यातील बस थांब्यापर्यंत कोरोनाचा धोका चालक- वाहकांच्या सतत मागावर असतो. प्रवाशांच्या गर्दीत कोण बाधित आहे, हे कळण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लसीसाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
बॉक्स
चालक-वाहक सुरक्षित
बसमधून प्रवास करणाऱ्यांकडे कोणतेही सर्टिफिकेट नसल्याने अनिश्चिततेच्या सावटाखाली या कर्मचाऱ्यांना सेवा बजावावी लागत आहे. गतवर्षी कोरोना काळात परराज्यात चालकांनी सेवा दिली. मुंबईतील बेस्टच्या मदतीलासुद्धा येथील चालकांनी सेवा देऊन सातत्याने माणसांच्या गराड्यात राहणारा चालक-वाहक अद्याप सुरक्षित आहे.
कोट
प्रवाशांच्या गर्दीत चालक-वाहकांना काम करावे लागत आहे. रोज त्यांचा गर्दीतील प्रवाशांशी संपर्क येत असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे. शासनाने सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रित केले आहे. गर्दीत कोरोना संक्रमित असू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळातील चालक वाहक तसेच स्थानकावरील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी.
- बाळासाहेब राणे,
विभागीय सचिव, एसटी कामगार सेना