अमरावती : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून, उत्कृष्ट बसस्थानकांना दोन कोटी रुपयांवर रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती स्तर व विभागीय स्तर अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. स्वच्छता अभियानाचा आराखडा तयार करणे, मूल्यांकनासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, अभियानाचे सर्वेक्षण करून योग्य त्या बदलांसह मार्गदर्शन करणे ही या समितीची कार्यकक्षा आहे. महामंडळाच्या सर्व स्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढ-उतार, बसस्थानक, बसफेऱ्यांची संख्या आदी निकषांच्या आधारे बसस्थानकांचे अ, ब व क असे वर्गीकरण करण्यात आले.
त्यातून स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर, प्रवासी बस, टापटीपपणा यासंदर्भात स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे. विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. तपासणी होणार आहे. महामंडळाच्या सहा प्रदेशांमध्ये प्रत्येकी नऊ याप्रमाणे प्रादेशिक स्तरावर ५४ बसस्थानके पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत.
एकूण गुणांच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त बसस्थानकांचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार आहे. प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बसस्थानक प्रथम, द्वितीय, तृतीय, ब वर्ग प्रथम, द्वितीय, तृतीय, क वर्ग बसस्थानक प्रथम, द्वितीय, तृतीय, तर राज्यस्तरावर विजेत्या बसस्थानकाच्या पारितोषिकाची रक्कम अ वर्ग प्रथम, ब वर्ग प्रथम आणि क वर्ग प्रथम याप्रमाणे रोख स्वरूपात तसेच चषक व प्रशस्तिपत्र देऊन पारितोषिके दिले जाणार आहेत.लोकसहभागातून अभियानअभियानातील जास्तीत जास्त कामे लोकसहभागातून करावीत, त्यासाठी निधी उभारणे, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, प्रवासी संघटना आदींमार्फत करून श्रमदानातून काम करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे.