जितेंद्र दखने
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झालेल्या १५ महिला बसचालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता या महिलांनी चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यानंतर त्यांना विभागातील पाच आगारामध्ये चालक कम वाहक म्हणून महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदा एसटी बसचे स्टिअरिंग महिलांच्या हाती येणार आहे.
अमरावतीएसटी विभागाला १५ ऑगस्टपूर्वी महिला एसटी चालक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांचे ८० दिवसांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. तज्ज्ञ अधिकाऱ्यांद्वारे त्यांची अंतिम चाचणी घेतत्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच महिला चालकांवर एसटी व प्रवाशांची जबाबदारी सोपवली. जिल्ह्यातील आठपैकी पाच विविध एसटी स्थानकांवर महिला चालकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग दिसणार आहे. २०१८ मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चालक आणि वाहक भरतीसाठी परीक्षा घेतली होती. त्यात १५ महिला चालक पात्र ठरल्या. त्यांच्या भरतीची प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतर या महिला चालकांना पदस्थापना दिली. त्यामुळे आता जिल्ह्यात लालपरी चालवताना महिला वाहकानंतर महिला चालक दिसणार आहेत.
कोविडने लावला ब्रेक
२०१९ मध्ये एसटी महामंडळात भरती झालेल्या या आठही जणींच्या प्रशिक्षणाची वाट कोरोनाने रोखली होती. कोरोनाची लाट ओसरल्यावर त्यांना ३०० दिवसांचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर एसटी प्रशासनाने महिला चालकांना आणखी ८० दिवस प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुन्हा ८० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. अमरावती विभागातील आठपैकी पाच आगारांमध्ये १५ महिलांना स्वातंत्र्य दिनापूर्वीच चालक कम वाहक म्हणून पदस्थापना दिलेली आहे. संबंधित महिला एसटी कर्मचारी नवीन ठिकाणी रुजू झाल्याची माहिती विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.
अशा आहेत आगारनिहाय महिला
विभागातील आठ आगारांपैकी पाच आगारांत पहिल्यांदा एसटी महामंडळात महिला चालक कम वाहक म्हणून १५ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मनीषा भगत, मनीषा जऊळकर, भाग्यश्री परनाटे, सविता शास्त्रकार या महिलांना मोर्शी आगारात, तर पूजा बोरकर, आरती भटकर, प्रिया काळे, अश्विनी ढिगवार, शुभांगी खेडकर यांना चांदूर बाजार, राजश्री इंगोले परतवाडा, राजश्री बागडे, कीर्ती बोंद्रे वरूड, कांचन तुमडाम, रिना जिवने, प्राजंली डब्बावार चांदूर रेल्वे याप्रमाणे महिलांना चालक कम वाहक म्हणून नियुक्ती दिलेली आहे.