अमरावती : मोर्शी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुल परिसर गुंडगिरीचा नवा अड्डा ठरला आहे. गुरुवारी गुंड प्रवृत्तीच्या काही तरुणांनी परिसरातील मस्का चहा नामक दुकानात क्षुल्लक कारणावरून दुकानचालकावर जोरदार हल्ला केला. दुकानाची तोडफोड केली. स्टेडियममध्ये येणारे खेळाडू, महिला, मुली, लहान मुले यांच्यासह महाविद्यालयांच्या या परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचाच प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.अलीकडेच संकुल परिसरात तरुणांमध्ये चाकू निघाले होते. एका कॉलेजकुमारीच्या चुंबन प्रकरणातून शिताफीने घडविण्यात आलेला 'क्राइम' तर शहरातील चलाख गुन्हेगारी प्रवृत्तीचे चिंताजनक उदाहरण म्हणून समोर आले आहे.'तशा' दुकानांमुळे वाढली गुन्हेगारीसंकुल परिसरात तरुण-तरुणींना आकर्षित करण्याच्या उद्देशानेच गरम व शीतपेयांची दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने सामान्य वाटत असली तरी त्यांची अंतर्गत रचना तरुण-तरुणींना ‘स्पेस’ उपलब्ध करून देणारी आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजविण्याची, बर्थ डे, व्हॅलेन्टाईन, लव्ह, ब्रेकअप पार्टीची सुविधा उपलब्ध करून देणारी खास व्यवस्था या दुकानांमध्ये आहे. त्यामुळे सदर दुकानांमधील ग्राहक कौटुंबिक नसून, प्रेमीयुगुल, युवक-युवती असाच असतो. तरुणींचे घोळके नि त्यांच्यामागे तरुणांचे टोळके असे वातावरण या परिसरात निर्माण झाले आहे. प्रेमीयुगुलांना तर ही दुकाने हक्काची जागा ठरली आहे. दुकानाबाहेर रस्त्यावर सतत या मुलामुलींचे घोळके असतात. वाट्टेल तशी वाहने ते रस्त्यावर उभी करतात. बरेचदा वाहने राँग साइडने आणली जातात. रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणींचा वावर या परिसरात असतो. सिगार, मद्यपानही उघडपणे केले जाते.पैशाच्या हव्यासापोटी!कमी कालावधीत अधिक पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी हे व्यवसाय या परिसरात फोफावले आहेत. भांडणे, हाणामारी, अश्लील शिवीगाळ या बाबी आता नित्याच्याच झाल्या आहेत. पोलिसांना या बाबींची कल्पना असली तरी केवळ 'तक्रार नाही' या सबबीखाली सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पोलीस केवळ घडलेल्या गुन्ह्यांच्या लिखित तक्रारींचे निवारण करण्यासाठीच आहेत की गुन्हे घडू न देणेही त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, या मुद्यावर आता नव्या सरकारातील पालकमंत्र्यांना विचार करावा लागणार आहे.चौघांविरुद्ध गुन्हेअनमोल अशोक जयस्वाल याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम ४५२ (तोडफोड करणे), ३२४ ( मारहाण) व शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदविला. भावेश, कुशल व दोन अनोळखी तरुणांचा आरोपींमध्ये समावेष आहे. प्रतिष्ठानाबाहेर सिगारेट ओढण्यास आरोपींना मनाई केल्यामुळे आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत चहा विक्री प्रतिष्ठानात घूसून मारहाण व तोडफोड केल्याचे अनमोलने तक्रारीत म्हटले आहे.रस्त्यावरच चाळे !दिवसभर अनेक युवक-युवतींचा वावर संकुल परिसरात असतो. यातील काही स्थानिक, तर काही शिक्षणाच्या निमित्ताने अमरावतीत आलेले असतात. 'तो' तिला किंवा 'ती' त्याला या परिसरातील दुकानांमध्ये भेटायला बोलविते. भेटीचे ठिकाणच संकुल परिसर असल्यामुळे प्रथम दुकानात आणि नंतर दुकानांच्या बाहेर रस्त्यावरही त्यांचे कैक तास निघून जातात. भावना अर्थातच अनावर झालेल्या असतात. मग कशाचीच चिंता नसते. रस्त्यावरच सुरू होतात प्रेमलीला. सांस्कृतिक राजधानी अशी अभिमानास्पद बिरुदावली माथी मिरविणाऱ्या अंबानगरीच्या स्टेडियम संकुल परिसरातील रस्त्यावर, कानाकोपऱ्यांमध्ये, स्टेडियमच्या आतील परिसरात ही अशी दृश्ये सहज बघता येणारी आहेत. विभागीय क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी अनेक महिला त्यांच्या लहान मुलांना स्केटिंग, धनुर्विद्या, शूटिंंग आणि इतर खेळांसाठी घेऊन येतात. तथापि, या असुरक्षित आणि असभ्य वातावरणामुळे शहरभरातून येणाºया अनेक महिला संताप व्यक्त करीत असतात. पोलीस, स्टेडियम प्रशासन मात्र उपाय योजण्यात अपयशी ठरले आहेत.
स्टेडियम संकुल गुंडगिरीचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM
अलीकडेच संकुल परिसरात तरुणांमध्ये चाकू निघाले होते. एका कॉलेजकुमारीच्या चुंबन प्रकरणातून शिताफीने घडविण्यात आलेला 'क्राइम' तर शहरातील चलाख गुन्हेगारी प्रवृत्तीचे चिंताजनक उदाहरण म्हणून समोर आले आहे. 'तशा' दुकानांमुळे वाढली गुन्हेगारी
ठळक मुद्देमुलींचे घोळके नि मुलांचे टोळके, पार्किंगच्या मुद्यावरूनही भांडणे, प्रेमीयुगुलांसाठी दुकानांत खास व्यवस्था